आवंडी धनगरवाड्यात ८ गायींचा अज्ञात रोगाने मृत्यू

0
39

आजरा (प्रतिनिधी) : तालुक्यातील आवंडी धनगरवाडा क्रमांक ३ मध्ये ८ गायींचा अज्ञात रोगाने मृत्यू झाला आहे. या घटनेने धनगर बांधवांमध्ये खळबळ उडाली आहे. मृत्युमुखी पडलेल्या गायींबाबत हळहळ व्यक्त होत आहे. तालुका पशुवैद्यकीय विभागाने तातडीने कार्यवाही करण्याची आणि उर्वरित पशुधन वाचविण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी होत आहे.

या धनगरवाड्यावरील गायींचा गेल्या काही दिवसात आकस्मिक मृत्यू होऊ लागला आहे. नेमके कारण समजू न शकल्याने हे समाज बांधव सैरभैर झाले आहेत. गुरुवारी रात्रीच्या सुमारास गोठ्यात बांधलेल्या गायी मृत्यू पावल्याचे आढळून आल्याने हे अज्ञात रोगाचे प्रकरण असल्याचा संशय बळावला आहे. आजतागायत येथील विठू बाबू कोकरे यांच्या २, बयाजी गंगाराम कोकरे यांची १, बबन कोकरे यांची १, कोंडिबा गंगाजी कोकरे यांच्या २ तसेच कोंडिबा धुळू कोकरे व जानू बाबू कोकरे यांच्या प्रत्येकी एक अशा आठ गायी दगावल्या आहेत.

आज सकाळच्या सुमारास येथील वाड्यावरील आणखी तीन गायी गंभीर असल्याची स्थिती आहे. तालुका पशुवैद्यकीय विभागाने या घटनेची तातडीने चौकशी करावी, अशी मागणी होत आहे. काही दिवसांपूर्वी या जनावरांचे आवश्यक लसीकरण झालेले असतानाही या घडलेल्या प्रकाराने सर्वच हवालदिल झाले आहेत.