कुरुंदवाड (प्रतिनिधी) : दत्तवाड (ता. शिरोळ) येथील हॉटेल शुभ्रामध्ये बंद खोलीत सुरू असलेल्या तीन पानी जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून रोख रकमेसह 4 लाख ५३ हजार ३३१ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी ८ जणांवर कुरुंदवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, उदय काकासो पाटील हे स्वत:च्या मालकीच्या हॉटेल शुभ्रामध्ये एका खोलीमध्ये तीन पाणी जुगार अड्डा चालवत होते. पोलिसांनी रविवारी रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास हॉटेलवर छापा टाकून ८ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ८६ हजार ३०० रुपये रोख, २७ हजारांचे ६ मोबाइल हँडसेट, ३ लाख ४० हजार रुपयांची २ वाहने असा ४ लाख ५३ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

याप्रकरणी मल्लाप्पा साताप्पा भिसरकोप (वय ३७), मानतेस महादेव हेगले (वय २८), भीमा अण्णाप्पा दळवाई (वय ३९), इराप्पा रामू बोरगावे (वय ३४), सुरेश बाबाजी जाधव (वय ३७, सर्व रा. भिर्डी ता. रायबाग जि. बेळगाव) तर तौफिक चंदुलाल नदाफ (वय ३५), रवींद्र काकासो पाटील (वय ३५), उदय काकासो पाटील (वय ३४) यांना अटक केली आहे.

ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी भांगे, पोलीस उपनिरीक्षक किशोर खाडे, सचिन पुजारी, अमित पवार, प्रकाश हंकारे यांनी केली. अधिक तपास पोलीस नाईक प्रकाश हंकारे करीत आहेत.