राशिवडे (प्रतिनिधी) :  राधानगरी तालुक्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांमध्ये ८१३८९ इतक्या व्यक्ती लसीकरणास पात्र आहेत. दि. ४ मार्चपासून आज दि. ९ जुलैपर्यंत ६३९४६ इतक्या लोकांचे लसीकरण झाले आहे. त्यामुळे तालुक्याच्या लसीकरणाची टक्केवारी ७९ टक्के इतकी झाली आहे.

तर राधानगरी तालुक्यात आजअखेर १०७  इतकी कोरोना रुग्णांची सक्रिय संख्या आहे. राधानगरी तालुक्यातील राशिवडे बु, धामोड, सरवडे, कसबा तारळे, ठिकपुर्ली, कसबा वाळवे, राधानगरी आणि सोळांकूर या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये १९८ गावे समाविष्ट आहेत. या गावातंर्गत एकूण ३,२७,२१६ लोकसंख्येतील ४५ ते ६० वर्ष वयोगटांमधील २४,९९४ इतके नागरिक पात्र आहेत. तसेच ६० वर्षांवरील ४१,३५४ असे एकूण ८१,३९८ इतके नागरिक लसीकरणासाठी पात्र आहेत.

मध्यंतरी लसीच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे आजपर्यंत ७९ टक्के लसीकरण झाले आहे. १८ ते ४४ वर्ष वयोगटातील १८८ जणांना पहिला डोस तर २९३ लोकांना दोन डोस मिळाले आहेत. लसीच्या उपलब्धतेनुसार लवकरात लवकर लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी राजेंद्रकुमार शेटे यांनी सांगितले.