कोल्हापूर (प्रतिनिधी) : नोटाबंदी केलेले केंद्रशासन व पंतप्रधान आणीबाणी आणून लोकांचे पैसे जप्त करणार आहेत. अशी भीती घालून एकाने वृद्ध दाम्पत्याच्या घरातील ६६ लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे याप्रकरणी रेखा जगन्नाथ दाभोळे  (वय ७५, रा रत्नोदया सोसायटी, नागाळा पार्क) यांनी अनिल सुभाष  म्हमाने (रा. दलाल मार्केट, लक्ष्मीपुरी) याच्याविरोधात आज शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नागाळा पार्क येथील जगन्नाथ दाभोळे हे आंबेडकरी चळवळीमध्ये सक्रिय होते. आंबेडकरी चळवळ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पुस्तके छापण्यापासून त्यांची लक्ष्मीपुरी येथील अनिल म्हमाने याच्याशी ओळख झाली होती. यातून म्हमाने हा दाभोळे यांच्या घरी नेहमी जात होता. म्हमाने याने दाभोळे यांना गुरु मानले आहे. असे सांगत दाभोळे यांच्यासह त्यांच्या पत्नीचा विश्वास संपादन केला होता.

मागील वर्षी केंद्र शासनाने नोटाबंदी करून नवीन नोटा चलनामध्ये आणल्या होत्या. त्यानंतर म्हमाने याने दाभोळे दांम्पत्याला केंद्र सरकारने नोटा बंदी करून लोकांचे नुकसान केले आहे. केंद्र सरकार आणीबाणी आणून लोकांचे पैसे जप्त करणार आहेत, अशी भीती घातली होती. म्हमाने याने दाभोळे दांम्पत्याला त्यांच्या विविध बँक खात्यातील ६६ लाखांची रक्कम काढावयास लावली. ही रक्कम दाभोळे यांच्या घरातील  बेडरूममध्ये पिशवीमध्ये घालून लपवून ठेवण्यास सांगितले. त्यानंतर म्हमाने याने चहा, दूध आणि भाकरीतून गुंगीचे औषध घालून रेखा दाभोळे यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले होते. या दरम्यान त्याने जगन्नाथ दाभोळे हे आजारी असताना त्यांच्या घरामध्ये जाऊन बेडरूममधील ६६ लाखांची बॅग दाभोळे त्यांची नजर चुकवून चोरून नेली.

चार सप्टेंबर रोजी घरातील ६६ लाखांची रक्कम चोरीला गेल्याचे दाभोळे दांम्पत्याच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी या रकमेची शोधाशोध केली मात्र त्यांना रक्कम आढळून आली नाही. त्यामुळे या प्रकरणी रेखा दाभोळे यांनी अनिल म्हमाने याच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे. पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल वाघमारे अधिक तपास करत आहेत.