दिवसभरात ६३ हजार ९०० रुपये दंड वसूल : आयुक्त

0
232

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहरात कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचा भंग केल्याप्रकरणी काल (रविवारी) एका दिवसात महानगरपालिका, केएमटी आणि पोलिस प्रशासनाच्या पथकाकडून ५९२ जणांकडून तब्बल ६३ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल केला असल्याचे, आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी सांगितले. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरात ही मोहिम यापुढे अधिक तीव्र करण्याचे निर्देश पथकांना दिले असल्याचेही त्या म्हणाल्या

दिवाळीच्या काळात शहरात विशेषत: दुकानांमध्ये होणारी गर्दी नियंत्रित ठेवण्यासाठी तसेच मास्क व सामाजिक अंतराचे पालन करण्यासाठी व्यापारी व दुकानदारांनी महापालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करुन आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे म्हणाल्या की, सध्या कोरोना संसर्ग कमी झाला असला, तरी कोरोनाचा धोका टळलेला नाही, आगामी काळात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मास्क लावणे, सॅनिटायझर वापरणे, सामाजिक अंतराचे पालन करणे, रस्त्यावर न थूंकणे, साबणाने वारंवार हात धुणे, गर्दी टाळणे या बाबींचे नागरिकांनी पालन करणे आवश्यक आहे. विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यासाठी महापालिका प्रशासन, केएमटी  अणि पोलिस दलाची पथके संपूर्ण शहरभर कार्यरत ठेवली असून, दडात्मक कारवाई वाढविण्याचे निर्देश या पथकांना दिले असल्याचेही आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे सांगितले.