नंद्याळ, अर्जुनवाडातील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना ६२ लाखांची आर्थिक मदत…

0
22

सेनापती कापशी (प्रतिनिधी) : कागल तालुक्यात नंद्याळ,  अर्जुनवाडासह वादळी पावसाच्या गारपीटीमुळे शेतपिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ६२ लाख रुपयांची आर्थिक मदत मिळाली. यासाठी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सरकारच्या पातळीवर हा पाठपुरावा केला होता.     

गेल्या एप्रिल महिन्यात कागल तालुक्यातील नंद्याळ, अर्जुनवाडा गावांसह काही गावात वादळी पाऊस व गारपिटीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाले होते. नंद्याळ, अर्जुनवाडा या दोन गावांमध्ये नुकसानीचे प्रमाण जास्त होते. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी अर्जुनवाडा, नंद्याळ या गावांसह गारपिटीने नुकसान झालेल्या गावांची पाहणी केली होती. तसेच  झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचेही आदेश त्यांनी दिले होते.

त्यानंतर मदत व पुनर्वसन विभागाकडून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवण्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला. येथील शेतकऱ्यांना ६२ लाख रुपये नुकसान भरपाई मंजूर झाली आहे. नंद्याळ, अर्जुनवाडासह करड्याळ, जैन्याळ, मुगळी, हळदी, सुळकूड, बेलवळे खुर्द, बाळीक्रे, बस्तवडे या गावातील शेतकऱ्यांनाही आर्थिक मदत मंजूर झाली आहे.