अहमदाबाद (वृत्तसंस्था) : गुजरात निवडणुकीसाठी दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडले असून. जवळपास ५९ टक्के मतदानाची नोंद झाल्याची प्राथमिक माहिती आहे. १८२ सदस्यसंख्या असलेल्या विधानसभेसाठी दुसऱ्या टप्प्यातील ९३ जागांसाठी आज मतदान झाले. पहिल्या टप्प्यासह दुसऱ्या टप्प्यात झालेल्या मतदानाची मतमोजणी ८ डिसेंबर रोजी होणार आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. गुजरात विधानसभेसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान १ डिसेंबर रोजी पार पडले होते. पहिल्या टप्प्यातील १९ जिल्ह्यातील ८९ विधानसभा मतदारसंघासाठी ६३ टक्के मतदान झाले होते.

गुजरात विधानसभेसाठी आज दुसऱ्या टप्प्यात १४ जिल्ह्यांतील ९३ जागांवर मतदान पार पडलं. यामध्ये बनासकांठा, पाटण, मेहसाणा, साबरकांठा, अरवली, गांधीनगर, अहमदाबाद, आनंद, खेडा, महिसागर, पंचमहाल, दाहोद, वडोदरा आणि छोटा उदेपूर यांचा समावेश आहे. सकाळी ८ वाजता सुरू झालेले मतदान संध्याकाळी ५ वाजता संपले असून, आतापर्यंत ५८.६८ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.  आज झालेल्या दुसऱ्या टप्प्यात जवळपास ८३३ उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत. यामध्ये २८५ अपक्षांचाही समावेश आहे.

दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी भाजप आणि आप सर्वच म्हणजे ९३ जागांवर निवडणूक लढवत आहे, तर काँग्रेसने ९० जागांवर आपले उमेदवार दिले आहेत. काँग्रेसचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने दोन जागांवर उमेदवार उभे केले आहेत. भारतीय आदिवासी पक्षाने १२ उमेदवार उभे केले आहेत आणि बहुजन समाज पक्षाने ४४ उमेदवार उभे केले आहेत.

गुजरातमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अहमदाबादमध्ये मतदान केले. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोड शो केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे. प्रदेश काँग्रेसच्या कायदेशीर कक्षाचे अध्यक्ष योगेश रवाणी यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, भाजपचा झेंडा घेऊन आणि भगवा स्कार्फ परिधान केलेले मोदी राणीप येथील मतदान केंद्रापासून ५०० ते ६०० मीटर अंतरावर रोड शो केला आणि हा आचारसंहितेचा भंग आहे.