मुंबई (प्रतिनिधी) : शिंदे गटाच्या होणाऱ्या दसरा मेळाव्यात बीकेसीमध्ये शिवसेनेतील पाच आमदार आणि दोन खासदार हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमाने यांनी सांगितले. यानंतर ते दोन खासदार आणि पाच आमदार कोणते, याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगण्यास सुरूवात झाली आहे.

दसरा मेळाव्यावरून एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट आमने-सामने आल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान दोन्ही गटाकडून मोठ्या प्रमाणावर शक्तिप्रदर्शन करण्यासाठी चढाओढ सुरू आहे.

शिवसेनेचे ५० आमदार आणि १२ खासदार आमच्यासोबत आहेत. आता दोन खासदार आणि ५ आमदारांचा बीकेसी मैदानावर प्रवेश झालेला दिसणार आहे. शिंदे गटासोबत आहे तीच खरी शिवसेना, जी बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात आहे. शिवसेनेला सदैव शिव्या देणाऱ्यासह आम्ही गेलेलो नाही, या शब्दात टीका करत राज्यात खऱ्या अर्थाने हिंदुत्वाची युती झाली आहे. शिंदे आणि फडणवीसांच्या नेतृत्वात राज्याला गतिमान सरकार मिळाले आहे, असे तुमाने यांनी म्हटले आहे.

नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाला शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमानेंनी हजेरी लावली होती. त्यानंतर कृपाल तुमानेंनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हा दावा केला. हा दावा ठाकरेंसाठी धक्कादायक मानला जात आहे. कारण आधीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर शिवसेनेचे ४० आमदार आले आहेत. पुन्हा आणखी जर पाच आमदारांनी शिंदे गटात प्रवेश केला तर हा ठाकरेंसाठी मोठा धक्का असणार आहे. आज प्रवेश करणाऱ्या दोन पैकी एक खासदार मुंबईचा आणि एक मराठवाड्याचा असू शकतो. एक प्रभावी खासदार आज शिंदे गटात प्रवेश करू शकतो, असे तुमाने यांनीही म्हटले आहे.