कोल्हापूर (प्रतिनिधी) : गेल्या २८ दिवसांपासून वृद्धापकाळ व विविध आजारांनी ग्रस्त असलेले भारताचे पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्यावर योग्य प्रकारे चांगले उपचार व्हावेत, याकरिता राज्य शासनाच्या क्रीडा विभागाकडून त्यांना मदतनिधी मिळावा. यासाठी आमदार ऋतुराज पाटील यांनी क्रीडामंत्री सुनिल केदार यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्या पाठपुराव्यास यश आले असून पाच लाखांचा धनादेश क्रीडा मंत्रालयाने काढला आहे. तो त्यांच्या नातेवाइकांकडे सुपूर्द करण्यात येणार आहे.

हिंदकेसरी खंचनाळे यांच्यावर महावीर कॉलेजनजीकच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विविध व्याधींनी ग्रस्त असल्यामुळे वारंवार त्यांची प्रकृती चिंताजनक बनत होती. त्यांच्यावर योग्य उपचार व्हावेत, याकरिता राज्य शासनाने कर्तव्य म्हणून त्यांच्या उपचाराकरिता क्रीडा व युवा सेवा संचालनालयातर्फे राज्य क्रीडा विकास निधीतून हा पाच लाखांचा धनादेश मंजूर केला आहे. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे क्रीडामंत्री सुनील केदार व क्रीडा राज्यमंत्री आदिती तटकरे, पालकमंत्री सतेज पाटील यांचे सहकार्य लाभले असल्याचे आमदार ऋतुराज पाटील यांनी सांगितले.