टोप  (प्रतिनिधी)  :  टोप  (ता. हातकणंगले) येथील इंदिरा गांधी झोपडपट्टीत असणाऱ्या मास एक्स्प्रेस कार्गो   कुरीयर कंपनीचे गोडाऊन फोडून सुमारे अडीच लाखांचा मुद्देमाल लंपास केला होता. याप्रकरणी  शुभम संजय मिठारी,  रितेश तानाजी कांबळे, अक्षय संजय कांबळे (सर्व रा. नागाव), शुभम नंदकुमार गव्हाणे, आदित्य भिकाजी पाटील (रा. साई मंदिर, शिरोली पुलाची)  या ५ जणांना शिरोली पोलिसांनी २४ तासाच्या आत अटक  केली.  त्यांच्याकडून सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल आणि ४ लाखांची चारचाकी गाडी असा सुमारे ६ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

पोलिसांतून मिळालेल्या माहितीनुसार, मास एक्स्प्रेस कार्गो प्रा.लि. या कुरिअर कंपनीचे गोडाऊन शनिवारी (दि .२५) रात्री अज्ञात चोरट्यांनी फोडून अडीच लाखाचा माल चोरून नेला होता. याबाबतची फिर्याद उमेश गोपाळ मरगज याने रविवारी शिरोली पोलीस ठाण्यात दिली होती.

दरम्यान, शुभम संजय मिठारी  हा (एमएच ०९ एफ क्यू ७४४१)  या चारचाकी गाडीतून शिरोली येथील साई मंदिर येथे कॉटनकींग कंपनीचे शर्ट,  पॅन्ट,  टी शर्ट  असलेले दहा बॉक्स  घेऊन विक्रीसाठी येणार असल्याची माहिती खबऱ्याकडून पोलिसांना माहिती मिळाली. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश खांडवे, समीर मुल्ला, सतीश जंगम,  प्रविण काळे शिरोली येथील साई मंदिर येथे पोहोचले. तेथे  कपडे विक्री करणाऱ्या वरील पाच जणांना कपडे खरेदीचे बिल मागितले असता सुरुवातीला  त्यांनी उडवाउडवीची उत्तर दिली.  पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्यांनी कुरीअरचे गोडावून फोडून माल आणल्याचे कबूल केले.   पाचही आरोपी १८ ते २० वयोगटातील असल्याने त्यांनी  व्यसन व चैनीसाठी हे कृत्य केले असल्याचे पोलिसांकडून सांगितले जात आहे.