कोल्हापूर (प्रतिनिधी) : महावितरणच्या इचलकरंजी विभागातील अब्दुललाट शाखेतील ४५ कृषिपंप ग्राहक कृषी धोरणात सहभाग नोंदवून ११ लाख १८ हजार रुपयांचे थकीत वीज बिल भरून थकबाकीमुक्त झाले आहेत. महावितरणकडून कोल्हापूर मंडळाचे अधीक्षक अभियंता अंकुर कावळे यांचे हस्ते थकबाकीमुक्त ग्राहकांचा सन्मान करण्यात आला.

कृषी धोरण हे कृषिपंप ग्राहकांना थकबाकीमुक्त करणारे धोरण आहे. या धोरणात सहभागाची मुदत मार्च २०२२ पर्यंत आहे. या धोरणाचा लाभ अधिकाधिक कृषिपंप ग्राहकांना मिळावा, या हेतूने महावितरणकडून स्थानिक पातळीवर कृषी ग्राहकांचे मेळावे आयोजित केले जात आहेत.

कृषी धोरण २०२० अंतर्गत गत ऑक्टोबर महिन्यात अब्दुललाट शाखेतील ४५ ग्राहक थकीत वीज बिल भरून थकबाकीमुक्त झाले आहेत. त्यांनी थकीत विजबिलाची ५० टक्के रक्कम ११.१८ लाख एकरकमी भरणा करून ५० टक्केची माफी मिळविली आहे. त्याबद्दल थकबाकीमुक्तीचे प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. मेळाव्यादरम्यान ६ कृषिपंप ग्राहकांनी रक्कम रुपये ६१ हजार ७०० रुपये भरून कृषी धोरणात सहभाग नोंदविला आहे. अद्यापपर्यंत अब्दुललाट शाखेतील १ हजार ७५७ पैकी १ हजार १९२ कृषिग्राहकांनी  कृषी धोरणात सहभाग नोंदविला आहे. मेळावा यशस्वीतेसाठी शाखा अभियंता शिवराज पाटील यांच्यासह कर्मचाऱ्यांनी काम पाहिले.