कोल्हापूर जिल्ह्यातील योजनेसाठी उपमुख्यमंत्र्यांकडून ४०० कोटींचा निधी मंजूर  

0
52

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा सर्वसाधारण वार्षिक योजनेंतर्गत सन २०२२-२३ साठी ३२२ कोटींचा आराखडा राज्यस्तरीय समितीपुढे सादर करण्यात आला होता. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या प्रयत्नामुळे कोल्हापूर जिल्हा वार्षिक योजनेच्या वित्तीय मर्यादेत ७८ कोटींची अतिरिक्त भर पडून सन २०२२-२३ साठी  ४०० कोटींच्या निधीस राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी राज्यस्तरीय बैठकीत मंजुरी दिली.

कोल्हापूर जिल्ह्यात सुरु असलेली आणि प्रस्तावित कामे नाविन्यपूर्ण असल्याबद्दल कौतुक करुन उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, नवनवीन संकल्पनांचा वापर करुन कोल्हापुरकरांच्या गरजेनुसार नाविन्यपूर्ण योजना राबवाव्यात. सामाजिक उत्तरदायित्व निधी, जिल्हा वार्षिक योजना आणि लोकसहभागातून अशी कामे करण्यासाठी प्राधान्य द्यावे.

कोल्हापूर जिल्हा वार्षिक योजना २०२२-२३ च्या आराखड्याला मान्यता देण्यासाठी राज्यस्तरीय बैठक उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन पद्धतीने झाली. या बैठकीला मुंबईतून पालक सचिव राजगोपाल देवरा तसेच वित्त विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पुण्यातून विभागीय आयुक्त सौरभ राव सहभागी झाले. कोल्हापूरमधून पालकमंत्री सतेज पाटील, आमदार प्रकाश आवाडे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार यांच्यासह जिल्ह्यातील संबंधित यंत्रणांचे अधिकारी सहभागी झाले.

जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती, पर्यटन विकास आणि लोकसंख्या लक्षात घेता कोल्हापूर जिल्ह्यासाठी भरीव तरतूद करण्याची विनंती पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली. यावर आणखी वाढीव निधी देण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत चर्चा करु. राज्यस्तरीय बैठकीत पालकमंत्री पाटील यांनी मांडलेले मुद्दे अभ्यासपूर्ण असून याबाबींवर राज्यस्तरावर बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असेही पवार यांनी सांगितले.