नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हिमाचल प्रदेशमधील किन्नूरमध्ये एका प्रवासी बसवर दरड कोसळली. तसेच या दरडीमध्ये इतर अन्य वाहनेही अडकली असून किमान ४० जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. रेकाँग पिओ- शिमला मार्गावर हा अपघात आज (बुधवार) झाला. घटनास्थळी बचावकार्य सुरु करण्यात आले आहे.

ही बस किन्नूरमधून हरिद्वारकडे जात होती. छील जंगलाच्या परिसरात झालेल्या  दुर्घटनेमुळे हा महामार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे. डोंगराचा कडाच तुटून बसवर पडल्याने संपूर्ण बस या ढीगाऱ्याखाली सापडली. बसच्या चालकाला सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. तर या ढिगाऱ्याखाली अनेक प्रवाशी अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मदतकार्य सुरु करण्यासाठी इंडो तिबेटीयन सीमा पोलिसांच्या (आयटीबीपी) तुकडीला पाचारण करण्यात आले आहे.