कोल्हापूर (प्रतिनिधी)  : सध्या पावसाचा जोर ओसरला असला तरी पंचगंगा नदी अजून २०१९ सालच्या सर्वोच्च पातळीवर वाहत आहे . या पार्श्वभूमीवर लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासह मदत आणि बचाव कार्यासाठी NDRF च्या आणखी ४ तुकड्या कोल्हापूर जिल्ह्यात दाखल होणार आहेत. दुपारी हवाई मार्गाने कोल्हापूर विमानतळावर या तुकड्या दाखल होतील अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी ट्विटद्वारे दिली आहे .

कोल्हापूर जिल्ह्यात सलग चार दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्याला महापूराचा धोका निर्माण झाला आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. सध्या कोल्हापूर जिल्ह्यात NDRF च्या ३ तुकड्या कार्यरत आहेत. नव्या ४ तुकड्या येणार असल्यामुळे स्थलांतरणासह मदत आणि बचाव कार्य वेगाने सुरु ठेवता येणार आहे.

NDRF च्या तुकड्या पाठवून राज्य शासनाने केलेल्या मदती बद्दल ना सतेज पाटील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचे कोल्हापूर वासियांच्या वतीने आभार मानले आहेत.