पेशावर (वृत्तसंस्था) : पाकिस्तानमधील पेशावर येथील मशिदीत नमाज पठण सुरू असतानाच बॉम्बस्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत ३२ जणांचा मृत्यू झाला असून, तर १५८ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. यातील ९० जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व जखमींवर पेशावरच्या लेडी हार्डिंज रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ही घटना पेशावर पोलीस लाईनजवळ घडली आहे. या बॉम्बस्फोटात मशिदीची भिंत पडली आहे. दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. सोमवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास मशिदीत नमाज पठण सुरु असताना एका हल्लेखोराने स्वत:ला बॉम्बने उडवून घेतले. ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकले आहेत. त्यामुळे मृताची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.
बॉम्बस्फोटानंतर मशिदीबाहेर अनेकजण मदतीसाठी याचना करत आहेत. स्थानिकांनी या घटनेनंतर तत्काळ त्यांना मदत करण्यास सुरूवात केली. लेडी रीडिंग रुग्णालयाचे (एलआरसी) प्रवक्ते मोहम्मद असीम यांनी पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनला सांगितले की, हा परिसर पूर्णपणे बंद करण्यात आला आहे आणि केवळ रुग्णवाहिकांनाच परिसरात प्रवेश दिला जात आहे.
हल्ल्यानंतर पाकिस्तानी लष्कराने परिसराला वेढा घातला आहे. त्याच्या जवळच लष्कराच्या तुकडीचे कार्यालयही आहे. पोलिस लाइन्समध्ये उपस्थित लोकांचे म्हणणे आहे की, हा स्फोट खूप शक्तिशाली होता आणि त्याचा आवाज २ किलोमीटर दूरपर्यंत ऐकू आला. स्फोटानंतर धूळ आणि धुराचे लोट दिसत होते.
पाकिस्तानी मीडिया जिओ न्यूजनुसार, तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानने (टीटीपी) हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले, नमाजच्या वेळी मशिदीमध्ये सुमारे ५०० ते ६०० लोक उपस्थित होते. फिदाईन हल्लेखोर मधल्या रांगेत हजर होता.
येथे प्रवेश करण्यासाठी गेट पास दाखवावा लागत असल्याने तो पोलिस लाइन्समध्ये कसा पोहोचला हे समजू शकले नाही. मशीद कोसळली असून, अनेक लोक तिच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याचे समजते. तहरीक-ए-तालिबान (टीटीपी) पाकिस्तानचा या भागात बराच प्रभाव असून, यापूर्वी या संघटनेने येथे हल्ल्याची धमकीही दिली होती. या घटनेनंतरचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर उपलब्ध आहेत. यामध्ये जखमींना रुग्णालयात नेताना दिसत आहे.