कोल्हापुरात दोघांकडून ३१ किलो गांजा जप्त

0
38

कोल्हापूर (प्रतिनिधी) : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केलेल्या कारवाईत गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या दोन आरोपींना रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून ३ लाख ७२ हजार रुपये किमतीचा सुमारे ३१ किलो १३० ग्रॅम वजनाचा गांजा, मारुती कार, मोबाईल असा एकूण ९ लाख ८७ हजार ५०० रु. किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात यश आले आहे.

पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी जिल्हयात अमली पदार्थाचे सेवन, खरेदी-विक्री व साठा करणाऱ्या आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गोर्ले यांना दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक संजय गोर्ले यांनी पोलीस अंमलदारांना अमली पदार्थाची खरेदी-विक्री, सेवन व साठा करणाऱ्या लोकांचा शोध घेण्यास सांगितले.

दि.२२ जून रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहायक फौजदार विजय गुरखे व पोलीस नाईक महेश गवळी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राजाराम तलाव येथील जलसंपदा विभागाच्या प्रयोगशाळेजवळच्या मोकळया मैदानावर विक्रमनगर येथील रमेश शिंदे व त्याचा एक साथीदार गांजाची विक्री करण्यासाठी मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर गाडी (एम. एच. ०५ सी. एम. २००५) मधून येणार असल्याची माहिती मिळाली होती.

त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस निरीक्षक संजय गोर्ले, पो.उपनिरीक्षक शेष मोरे, अंमलदार विजय गुरखे, हिंदुराव केसरे, सचिन देसाई, महेश गवळी, दीपक घोरपडे, सोमराज पाटील, वैभव पाटील, सूरज चव्हाण, अनिल जाधव, महादेव कुराडे, सागर माळवे, सायबारचे प्रदीप पावरा यांनी राजाराम तलाव परिसरात सापळा लावून रमेश दादासो शिंदे (वय ४४, रा. विक्रमनगर), समाधान मारुती यादव (वय २९, रा. घाटंग्री, ता. उस्मानाबाद) यांना पकडले. त्यांच्याकडील ३,७२,००० रु. किमतीचा सुमारे ३१ किलो १३० ग्रॅम गांजा, सहा लाख रु. किमतीची मारुती सुझुकी स्विफ्ट व १५ हजारचा एक मोबाईल हॅन्डसेट असा एकूण ९ लाख, ८७ हजार ५०० रु. किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.