महाविद्यालीन विद्यार्थ्यांसाठी ३० टक्के लस राखीव ठेवावी : ना. उदय सामंत

0
29

नांदेड (प्रतिनिधी)  : ज्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे लसीकरणाचे दोन डोस झाले असतील अशा विद्यार्थ्यांना घेऊन महाविद्यालये सुरू करण्याच्या निर्णयापर्यंत आम्ही पोहचलो आहे. तसेच जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे लसीकरण व्हावे यासाठी जिल्ह्याला मिळणाऱ्या लस साठ्यांपैकी ३० टक्के लस विद्यार्थ्यांना राखीव ठेवल्यास ते लवकर शक्य होईल. त्यासाठी जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्याधिकारी, पोलीस अधीक्षक, महापालिका आयुक्तांच्या समितीने आम्हास निर्णय दिल्यास आम्ही महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी देऊ. असा प्रस्ताव राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ठेवला आहे.

ना. सामंत म्हणाले की, महाविद्यालये सुरू व्हावे हा रेटा वाढत असून तशी पालकांचीही इच्छा आहे. तथापि कोरोना परिस्थिती वरून आरोग्याच्या दृष्टीने जी काही सुरक्षा घ्यायची आहे, ती घेण्यात आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही. त्यामुळे महाविद्यालये सुरू करण्यास व दरम्यान कोरोना काळातील विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची फी कमी करण्यासंदर्भात सरकार प्रयत्नशील असल्याचेही सामंत यांनी सांगितले आहे.

उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाअंतर्गत येणाऱ्या इंजिनीअरिंग कॉलेज, बी फार्मसी, डी फार्मसी कॉलेज, पॉलिटेक्निक कॉलेजच्या १६  हजार ५०० फी माफ होणार आहेत. तसेच अनुदानित, विनाअनुदानित व खासगी कॉलेजची फी कमी करण्या संदर्भात कमिटीची स्थापना करण्यात आली असून या फी देखील कमी करण्याचा निर्णय थोड्याच दिवसात होणार आहे, अशी माहितीही उदय सामंत यांनी दिली.