मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांना अल्पावधीत जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून, एका कंपनीत सुमारे ३० लाख रुपयांची गुंतवणूक करण्यास भाग पाडले; मात्र याबाबत फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी याबाबत संगमनेरमधील तिघांविरोधात शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

भारत संभाजी भोसले (कोंची, पो. निमगावजाळी, ता. संगमनेर), विद्या संतोष अभंग व प्रथमेश संतोष अभंग (दोघेही रा. घुलेवाडी, ता. संगमनेर) अशी आरोपींची नावे आहेत. विशेष म्हणजे तीनही आरोपी करुणा मुंडेंनी काढलेल्या नव्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत.

या बाबत करुणा धनंजय मुंडे ( वय ४२, रा. सांताक्रुझ, मुंबई ) यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, संगमनेरमधील या तिघांनी धनंजय मुंडे यांच्याशी असलेल्या ओळखीतून त्यांची पत्नी करुणा मुंडे यांचा विश्‍वास संपादन करीत त्यांना लेवलसेट कन्स्ट्रक्शन या कंपनीबाबत माहिती दिली. या कंपनीत ३० लाखांची आर्थिक गुंतवणूक केल्यास दरमहा ४५ ते ७० हजार रुपये परतावा देण्याचे आमिष दाखवले. यापेक्षा अधिक प्रमाणात नफा मिळाल्यास त्या प्रमाणात अधिक नफा देण्यात येणार असल्याचे सांगितले.

या बोलण्याला भुलून करुणा यांनी ७ जानेवारी २०२२ पासून दहा दिवसांत रोख व धनादेशाच्या स्वरुपात त्यांना ३० लाख रुपये दिले. गुंतवणूकीनंतर मात्र या तिघांनी कोणतीही अधिक माहिती व नफा न देता फेब्रुवारी २०२२ मध्ये त्यांची खात्री पटावी यासाठी ४५ हजार रुपये परतावा दिला. त्यानंतर मात्र फोन न घेणे किंवा विचारलेल्या प्रश्नांची उडवाउडवीची उत्तरे देणे असे प्रकार सुरु झाले.मुंडे यांनी पैशांची मागणी केल्यानंतर त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची व समाजात बदनामी कऱण्याची धमकी दिली होती. तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.