कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी  बँकेकडे खातेदार असलेल्या सर्वच कर्मचाऱ्यांना बँकेने  ३० लाखांची विमा सुरक्षा योजना लागू केली आहे. राष्ट्रीय कृत कंपनी असलेल्या न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या विभागीय कार्यालयाच्या सहयोगातून बँकेने अवघ्या तीनशे रुपयांच्या हप्त्यात ही योजना सुरु केली आहे. योजनेच्या पहिल्या हप्त्याचा ६० लाख रुपयांचा धनादेश बँकेचे अध्यक्ष आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते विमा कंपनीकडे देण्यात आला.

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे  बचत खाती असलेल्या विविध नोकरदार आणि पगारदार संघटनांनी बँकेकडे लेखी आणि तोंडी स्वरूपात अशा विमा सुरक्षा योजनेची मागणी केली होती. त्या मागणीचा विचार करीत बँकेने १७ हजार पगारदारांच्या विमा सुरक्षेपोटी ६० लाख रुपयांचा धनादेश कंपनीकडे दिला. उर्वरित १३ हजार पगारदारांच्या विम्याची रक्कम दुसऱ्या हप्त्यात १५ मार्चपर्यंत दिली जाणार आहे.

यावेळी बँकेचे अध्यक्ष आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, धकाधकीच्या जीवनात अशी विमासुरक्षा आवश्यकच आहे. योजनेला पगारदारांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. उर्वरित पगारदार खातेदारांनीही या योजनेचा तातडीने लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

यावेळी बँकेच्या संचालक पी. जी. शिंदे, आ. राजेश पाटील, अशोक चराटी, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, सर्जेराव पाटील-पेरिडकर, भैय्या माने, अनिल पाटील, माजी खा. निवेदिता माने, विलासराव गाताडे, असिफ फरास, आर.के.पोवार श्रीमती उदयानीदेवी साळुंखे आदी उपस्थित होते.