‘ईडी’च्या छापेमारीत जिल्हा बँकेची 30 तास चौकशी; पाच कर्मचाऱ्यांना घेतलं ताब्यात

0
302

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर गेले दोन दिवस ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली. ही कारवाई तब्बल 30 तास सुरु होती. या कारवाईत ईडीच्या अधिकाऱ्यांनी सुमारे चार बॉक्स कागदपत्रे तसेच पाच अधिकारी व कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. त्यामुळे जिल्ह्याचे राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार काल दिनांक १ फेब्रुवारी रोजी कोल्हापूर जिल्हा बँकेवर ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली. या कारवाईत जिल्हा बँकेच्या मुख्य शाखेसह कागल तालुक्यातील कापशी बँकेचा ताबाही सक्तवसुली संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी घेत चौकशी सुरु केली आहे. तसेच आमदार हसन मुश्रीफ यांच्या संबंधीत असणाऱ्या बँकेच्या व्यवहारांची चौकशी देखील करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. ही कारवाई आज दिनांक २ फेब्रुवारी दुपारपर्यंत सुरु होती.

विघ्नसंतोषी लोकांमुळे ईडीची कारवाई

आमदार हसन मुश्रीफ या कारवाईबाबत बोलताना म्हणाले की, ईडीचा तपास सुरू आहे. तो तपास प्रभावित होईल. त्यामुळे, त्यावर मी भाष्य करणार नाही. ईडीची रेड झाली हे एका अर्थाने चांगलं झालं. कारण, काही विघ्नसंतोषी लोकांनी ईडीच्या अधिकाऱ्यांच्या मनात मी स्वतः केडीसीसी बॅकेचा चेअरमन, तसेच कारखाना याबाबत जे- जे गैरसमज निर्माण केले असतील त्या सगळ्याचे निराकरण होईल, अशी मला खात्री आहे.