जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडे ३० कोटींची थकीत वीजबिले     

0
9

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडे सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांची २२ कोटी ३७ लाख, तर पथदिव्यांची ७ कोटी ४० लाख रुपयांची चालू वीज देयके थकीत आहेत  तरी अखंडीत वीज पुरवठ्यासाठी ग्रामपंचायतींनी थकीत चालू वीज देयकांचा भरणा करुन सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

सद्यस्थितीत महावितरण आर्थिक संकटात असून थकबाकी वसूलीचे आव्हान उभे ठाकले आहे. महावितरणकडून थकबाकी वसुलीसाठी थकबाकीदार वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची धडक मोहीम राबविली जाते आहे. ग्रामपंचायतींकडेही सार्वजनिक पाणीपुरवठा व पथदिव्यांची वीज देयके थकली आहेत. त्या अनुषंगाने थकीत वीज देयकांचा निर्णय होईपर्यंत, ग्रामपंचायतींनी सार्वजनिक पाणीपुरवठा व पथदिव्यांची चालू वीज देयके स्वनिधीतून भरण्याचे ग्रामविकास विभागाने निर्देशित केले आहे. त्या संदर्भातील दिरंगाईस संबंधित ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक व सरपंच यांना वैयक्तिकरित्या जबाबदार धरण्यात येईल, असे नमुद केले आहे.