मुंबई : रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन आणि हरिहरेश्वर येथे संशयास्पद आज सकाळी बोट आढळली असून, या बोटीत तीन एके-४७ रायफल्स आणि काही कागदपत्रेही आढळून आली आहेत. दरम्यान, या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत याबाबत माहिती दिली आहे. ‘ही बोट एका ऑस्ट्रेलियन नागरिकाची असून, बोटीचे इंजिन बिघडल्याने ती रायगडच्या समुद्रकिनाऱ्यावर तरंगत आली’, असे ते म्हणाले.

आज श्रीवर्धन आणि हरिहरेश्वरच्या समुद्रकिनाऱ्यावर एक १६ मीटर लांबीची बोट स्थानिकांना आढळून आली आहे. त्यांनी ही माहिती स्थानिक पोलिसांनी दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत बोटीची पाहणी केली असता, या बोटीत ३ एके-४७ रायफल आणि काडतूस तसेच बोटीची कागदपत्रे आढळून आली. त्यानंतर तत्काळ हायअलर्ट जारी करण्यात आला. याची माहिती भारतीय कोस्टगार्ड आणि इतर यंत्रणांनाही देण्यात आली, अशी माहिती फडणवीस यांनी दिली आहे.

ते म्हणाले, या बोटीचे नाव लेडीहान असून, ती ऑस्ट्रेलियन महिला हाना लॉडर्सगनची ही बोट असून, तिचे पती जेम्स हार्बट हे या बोटीचे कप्तान आहेत. ही बोट मस्कतहून युरोपकडे जाणार होती. बोटीचे इंजिन बिघडल्याने बोटीवरील सर्वांना रेस्क्यू करण्यात आले. समुद्र खवळला असल्याने बोटीचे टोईंग करता आले नाही. त्यामुळे ती बोट रायगडच्या समुद्र किनाऱ्यावर आली. २६ जून रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास बोटीचे इंजिन निकामी झाले आणि बोटीवरील खलाशांनी मदतीसाठी कॉल दिला. त्याच दिवशी १ वाजताच्या सुमारास एका कोरियन युद्ध नौकेनं बोटीवरील खलाशांची सुटका केली आणि त्यांना ओमानला सोडले.