जयसिंगपूर (प्रतिनिधी) : जुलै २०१९ मध्ये आलेल्या महापूरामध्ये शेतीचे प्रचंड नुकसान झाले होते. यातील बहुतांशी शेतकऱ्यांना पीक नुकसानीची रक्कम तर काहींना पीककर्ज माफी मिळाली होती. तर यामधील काही शेतकऱ्यांचे उशिरा झालेले पंचनामे आणि संबंधित बँकांच्या चुकीच्या माहितीमुळे शिरोळसह जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकरी कर्जमाफी पासून वंचित राहिले होते.  

याबाबतचा विस्तृत अहवाल जिल्हा लेखापरीक्षण आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने विभागीय आयुक्तांकडे सादर केला होता. सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी ऑगस्ट २०२० मध्ये झालेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये सहकार व पणन विभागाला या शेतकऱ्यांना पीक कर्जमाफीची रक्कम तातडीने मिळावी, असा जोर धरला होता. यावेळी सहकार व पणन विभागाने १५ ऑक्टोंबर २०२० रोजी काढलेल्या परिपत्रकाद्वारे प्रलंबित पीक कर्जाचा रकमेला मंजुरी दिली होती.

दरम्यानच्या काळात शिक्षक आणि पदवीधर संघ विधानपरिषद निवडणूकांच्या आचारसंहितेमुळे वैयक्तिक लाभाची बाब म्हणून या रकमा संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाल्या नव्हत्या. याबाबत राज्यमंत्री यड्रावकर यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे आज (सोमवार) परिपत्रक काढून सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या थकीत असलेल्या पीक कर्जाचा लाभ आणि त्यांच्या रकमा जमा करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे शिरोळ तालुक्यामधील नुकसानग्रस्त २६५ शेतकऱ्यांच्या पीक कर्जाची  जवळपास २ कोटी २५ लाखाची रक्कम त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे.