साळवण (प्रतिनिधी) : पावसाने दमदार सुरुवात केली असून, गगनबावडा परिसरात २५९ मि. मी., तर धरण क्षेत्रात २८२ मि.मी. अशी पावसाची उच्चांकी नोंद झाली आहे. सांगशी, शेणवडे, मांडुकली बंधारे पाण्याखाली गेले आहेत. बळीराजानेही या पावसाची धास्ती घेतली आहे.

सोमवारी करुळ घाटात ठिकठिकाणी दरडी कोसळल्या. भुईबावडा घाटातही दरडी कोसळल्याने चार तास वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. आता वाहतूक सुरू असली तरी अतिवृष्टीमुळे कोणत्याही क्षणी दरडी कोसळण्याची शक्यता असल्याने वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन वाहतूक करावी लागत आहे.

सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. घाटात ठिकठिकाणी धबधबे प्रवाहित झाले असून, पर्यटकांची रीघ लागली आहे. तथापी वर्षा सहलीला जाऊ नये, असे जिल्हाधिकारी यांनी आवाहन केले आहे. सध्या सगळीकडे जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे. आम्ही सर्व ग्रामपंचायतींना तसेच आपत्ती व्यवस्थापन समितीशी संपर्क साधला असून, नागरिकांना सतर्क व सावधान राहण्याचा इशारा प्रशासनाने दिला असल्याचे गगनबावडा येथील तहसीलदार डॉ. संमेश कोडे यांनी म्हटले आहे.