मुंबई (प्रतिनिधी) : खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल असलेले मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह २५ पोलीस अधिकाऱ्यांना निलंबन  करण्याचा प्रस्ताव पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी गृहखात्याकडे पाठविला आहे.  

या यादीत परमबीर सिंग यांच्यासह वेगवेगळ्या प्रकरणांत आरोपी असलेले चार उपायुक्त व सहाय्यक पोलिस आयुक्तांचा समावेश आहे. गृहखात्याने या प्रस्तावावर सावध भूमिका घेतली आहे. या प्रकरणातील सर्व अधिकाऱ्यांची सविस्तर माहिती मागविण्यात आली आहे. पोलिस महासंचालकांनी पाठवलेल्या प्रस्तावात उपायुक्त आणि पोलिस अधीक्षक पदावरील क्लास वन अधिकारी आहेत. त्या संदर्भातील फाइल मुख्यमंत्र्यांकडे पाठवावी लागणार आहे. त्यामुळेच पोलीस महासंचालकांना सविस्तर अहवाल देण्यास सांगितले आहे.  दरम्यान, तब्बल २५ सुपर क्लासवन अधिकाऱ्यांचे निलंबन करणे ही मोठी कारवाई असेल. याचा परिणाम अधिकाऱ्यांच्या मनोधैर्यावर होऊ शकता. मात्र, परमबीर सिंग यांच्यावरील कारवाई अटळ असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे.