कोल्हापूर (प्रतिनिधी) : दिलेल्या मुदतीत काम चालू केले नसल्याने ठेकेदार शैलेश उदयसिंह भोसले यांना कामामध्ये दिरंगाई केल्याबद्दल विलंब आकार म्हणून २४ हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे.

महापालिकेच्या विभागीय कार्यालय क्र. २ छत्रपती शिवाजी मार्केट अंतर्गत प्रभाग क्रमांक ३३ महालक्ष्मी मंदिर या प्रभागातील जामदारवाडा, मोमीन ग्लास सेंटर, सोडा कॉर्नर, ताईबाई गल्ली, शायरन फुटबॉल ग्रुप, डॉ. पाटील बोळ घर ते शिंदे घर या परिसरात गटर व पॅसेज काँक्रिटीकरण करण्याचे काम ठेकेदार शैलेश भोसले यांच्या नावे मंजूर आहे. या कामाचा कार्यादेश दि. १५ फेब्रुवारी २०२२ रोजी ठेकेदार भोसले यांना देण्यात आला होता. या कामास १८० दिवस मुदत दिलेली आहे.

संबंधित ठेकेदार शैलेश भोसले यांनी विहित मुदतीत काम चालू केले नसल्याने त्यांना प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी रक्कम २४ हजार रुपयांचा दंड ठोठावण्याच्या सूचना उप-शहर अभियंता यांना दिल्या. त्याप्रमाणे विभागीय कार्यालय क्र. २ ने ठेकेदार शैलेश भोसले यांना त्यांच्या आदा करावयाच्या बिलातून विलंब आकार २४ हजार रुपये देय रकमेतून कपात केले. त्याचबरोबर महापालिकेकडील ११९ कामांसाठी ३९ ठेकेदारांना विहित मुदतीत काम चालू केले नसल्याने त्यांनाही नोटीस बजावण्यात आल्या आहेत.