यूपीएससी परीक्षेत सारथीचे २१ विद्यार्थी यशस्वी : अशोक काकडे

0
10

कोल्हापूर, (प्रतिनिधी) : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नुकत्याच जाहीर झालेल्या परीक्षेच्या निकालामध्ये सारथी प्रायोजित यूपीएससी प्रशिक्षण उपक्रमातील २१ विद्यार्थ्यांची अंतिम गुणवत्ता यादीत निवड झाली आहे. तर विनायक नरवाडे गुणवत्ता यादीत ३७ वा असल्याची माहिती सारथीचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी दिली.

सारथी संस्थेने मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा -कुणबी या लक्षित गटातील होतकरू विद्यार्थ्यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या तयारीकरिता विद्यावेतन देऊन दिल्ली व पुणे येथील नामांकित कोचिंग संस्थेत निशुल्क प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली होती. यूपीएससी मुलाखतीच्या तयारीसाठी  विशेष प्रशिक्षण आयोजित करून तज्ज्ञांमार्फत झूम मीटिंगद्वारे मार्गदर्शन देण्यात आले. व सारथी संस्थेत अभिरूप मुलाखतीचे आयोजन करून विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन देण्यात आले.

नुकत्याच जाहीर झालेल्या संघ लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा स्पर्धा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला. त्यात सारथी पुणे मार्फत प्रायोजित युपीएससी प्रशिक्षण उपक्रमातील २१ विद्यार्थ्यांची अंतिम गुणवत्ता यादीत निवड झाली आहे. यामध्ये चार विद्यार्थिनींचा समावेश आहे.

सारथी संस्थेचे अध्यक्ष अजित निंबाळकर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांनी उत्तम प्रशासन करून या देशाच्या विकासात आपला ठसा उमटवावा, अशा शुभेच्छा व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी दिल्या आहेत.