मुंबई/ पुणे (प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रीय गुप्तचर तपास यंत्रणेकडून (एनआयए) टेरर फंडिंगबाबत कसून तपास केला जात आहे आहे. या तपासाला आता वेग आला आहे. त्यामुळे पीएफआयचे (पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया) धाबे दणाणले आहे. एटीएस आणि एनआयएचे टीम एकत्रितपणे हा तपास करीत आहे.

पहाटे तीन वाजेपासूनच देशभरात एनआयएची छापेमारी सुरू आहे. टेरर फंडिंग, प्रशिक्षण शिबिरे उभारणे आणि प्रतिबंधित संघटनांमध्ये सामील होण्यासाठी लोकांची दिशाभूल केल्याप्रकरणी पीएफआयशी संबंधित कार्यकर्ते, त्यांच्या घरांवर आणि कार्यालयांवर छापे टाकले जात आहे. याप्रकरणी महाराष्ट्रातून २० जणांना, तर देशभरातून १०६ जणांना अटक करण्यात आली आहे.

पुण्यातून कयूम शेख आणि रझी अहमद खान या दोघांना अटक केली आहे. टेरर फंडिंगप्रकरणी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) संघटनेशी संबंधित कार्यालय, व्यक्ती आणि महत्वपूर्ण ठिकाणांवर गुरुवारी पहाटे एनआयए आणि स्थानिक पोलिसांनी छापे टाकले. एनआयएच्या छाप्यामध्ये मोठ्या प्रमाणात महत्त्वपूर्ण कागदपत्रे, इलेक्ट्रॉनिक डाटा जप्त करण्यात येत आहे. महाराष्ट्रात नवी मुंबई, भिवंडी, पुणे, नाशिक, कोल्हापूर, परभणी, औरंगाबाद, नांदेड, बीड, जालना, मालेगावसह आदी ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे.

पुण्यातील कोंढवा येथे पीएफआयचे कार्यालय आहे. कोंढवा परिसरातील उर्दू आणि इंग्रजी शाळांच्या इमारतीमध्ये पीएफआय बैठका पार पडत होत्या, अशी प्राथमिक माहिती आहे. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या दोन जणांना ‘एनआयए’ने परभणीतून उचलले आहे. त्यांना नांदेडला नेण्यात आले आहे. शहरात त्यांचे अधिकृत कार्यालय नाही. घरातून यांचा कारभार चालतो, असे समजते.

एका अधिकाऱ्याने सांगितले की, राष्ट्रीय तपास संस्थेने गुरुवारी सकाळी पीएफआय आणि दहशतवाद्यांना कथित समर्थन करणाऱ्या व्यक्तींसह गटांविरुद्ध देशव्यापी शोध मोहीम सुरू केली. आत्तापर्यंतच्या सर्वात मोठ्या सर्च ऑपरेशनदरम्यान टेरर फंडिंग, प्रशिक्षण शिबिरे आयोजित करणे आणि बंदी घातलेल्या संघटनांमध्ये सामील होण्यासाठी लोकांना कट्टरपंथीय बनवणे यात कथित सहभाग असलेल्या लोकांच्या घरांची झडती घेतली जात आहे, असे ते म्हणाले.