मुंबई (प्रतिनिधी) : पाकिस्तानच्या जलक्षेत्रात बेकायदेशीरपणे मासेमारी केल्याचा आरोपावरुन अटक केलेल्या २० भारतीय मच्छिमारांची पाकिस्तानातून सुटका झाली आहे. चार वर्षांची शिक्षा पूर्ण केल्यानंतर आज (रविवार) पाकिस्तानच्या लांधी जिल्हा कारागृहातून त्यांची सुटका करण्यात आली. या मच्छिमारांना उद्या (सोमवार) वाघा सीमेवर  भारताकडे सोपवले जाणार आहे. हे बहुतांश मच्छिमार हे गुजरातमधील आहेत.

यावेळी पाकिस्तानच्या लांधी कारागृहाचे अधीक्षक इर्शाद शाह यांनी, भारतीय अधिकाऱ्यांनी मच्छिमारांच्या राष्ट्रीयत्वाची पुष्टी केल्यानंतर त्यांना सोडण्यात आले आहे. हे मच्छिमार चार वर्षे तुरुंगात होते त्यांना आमच्या सरकारने सदिच्छा भावनेनी त्यांची आज सुटका केली आहे. ईधी ट्रस्ट फाउंडेशन या सामाजिक संस्थेने सुटका करण्यात आलेल्या २० भारतीय मच्छिमारांना लाहोरमधील वाघा बॉर्डरवर नेण्याची सोय केली आहे. उद्या त्यांना भारतीय अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिले जाणार असल्याचे सांगितले.