कुरुंदवाड (प्रतिनिधी) : नगरपरिषदांना देण्यात येणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत जयसिंगपूर नगरपरिषदेला क्रीडासंकुल (स्पोर्टस् कॉम्प्लेक्स) उभारण्यासाठी २० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. हा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत.

शिरोळ तालुक्यातील खेळाडूंसाठी दर्जेदार सेवा सुविधा देणारे अद्ययावत असे एखादे क्रीडासंकुल असावे, यासाठी आमचे प्रयत्न सुरू होते. जयसिंगपूर शहरात भव्य क्रीडासंकुल व्हावे व यासाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळावा, याबाबत जयसिंगपूर नगरपरिषदेचे तत्कालीन उपनगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. नगरपरिषदेच्या या मागणी संदर्भात आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून स्पोर्टस् कॉम्प्लेक्स उभारण्यासाठी निधी मिळण्याची मागणी केली होती.

मंजूर झालेल्या २० कोटींच्या निधीमधून लवकरच भव्य आणि अद्ययावत असे क्रीडासंकुल उभारले जाईल. शिरोळ तालुक्यातील अनेक तरुणांनी वेगवेगळ्या क्रीडा प्रकारात जिल्हा राज्य व राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी केली आहे. अनेक नवोदित खेळाडू त्या त्या क्रीडा प्रकारात सराव करीत आहेत, अशा या सर्व खेळाडूंना या क्रीडासंकुलच्या माध्यमातून चांगल्या सुविधा देणे शक्य होणार आहे. क्रीडासंकुलची होणारी ही इमारत नवोदित खेळाडूंसाठी प्रोत्साहन देणारी ठरेल,

शिरोळ येथे मंजूर झालेल्या क्रीडासंकुलासाठी जागा संपादित केली असून, येथील क्रीडासंकुल उभारणीसाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करून घेऊन लवकरच शिरोळ येथे देखील सर्व सुविधांनी युक्त अद्ययावत अशा क्रीडासंकुल उभारणीच्या कामाला सुरुवात होईल, असेही आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी म्हटले आहे.