कोल्हापूर (प्रतिनिधी) :  पुलाची शिरोली (ता. हातकणंगले) सांगली रोडवर हॉटेल शिवतारा जवळ आज (गुरुवार) राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर जिल्हा भरारी पथकाने सापळा लावून ५ लाख ७५ हजारांचे गोवा बनावट मद्य वाहनासह जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी मनिष गंगाराम विश्नोई (वय २१, रा. गुल्हे, कोबेरी, ता. शेवडा, जि. बारनेर राजस्थान) आणि लालसिंग वचनसिंह राजपूत (वय २३, रा. निंम्बज सिरोई, ता. रेवदर) अशा दोघांना अटक केली आहे.

याबाबत अधिक माहिती की, कोल्हापूर-सांगली रोडवरुन बेकायदा गोवा बनावटीच्या मद्याची अवैध वाहतूक स्विफ्ट कार (क्र. एमएच ०५ एएक्स १३१३) मधून होणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार या मार्गावर पथकातील अधिकारीस कर्मचाऱ्यांनी कोल्हापूर- सांगली रोडवर हॉटेल शिवतारा येथे रोडवर पाळत ठेवली असता सकाळी ६.३० च्या सुमारास कोल्हापूरहून आलेल्या संशयास्पद स्विफ्ट येत असलेली दिसली. संबंधीत अधिकाऱ्यांनी या वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये गोवा बनावटीच्या विदेशी मद्याने भरलेले बॉक्स आढळून आले. वाहनचालक मनिष विश्नोई आणि लालसिंग राजपूत यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

या कारवाईत गोवा बनावटीच्या विविध ब्रँडच्या विदेशी मद्याचे ३० बॉक्स मिळून आले. त्याची बाजारभावानुसार एकूण किंमत २ लाख २५ हजार ८४० इतकी असून वाहनाची किंमत ३ लाख ५० हजार इतकी आहे. असा एकुण ५ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक, कोल्हापूरचे निरीक्षक संभाजी बरगे, दुय्यम निरीक्षक संजय मोहिते, विजय नाईक,  संदीप जानकर, सागर शिंदे, सचिन काळेल, मारुती पोवार, राजु कोळी, जय शिनगारे यांनी केली.