कुरुंदवाड (प्रतिनिधी) : आयकर विभागात आणि भारतीय सैन्य दलात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून कोलकत्ता येथील रुद्रकुमार व सुबोधकुमार या अनोळखी दोन व्यक्तींनी शहरासह जिल्हयातील १९ तरुणांना सुमारे पावनेदोन कोटीचा गंडा घातला आहे. अशी तक्रार आनंदा गणपती करडे (रा. कुरुंदवाड, ता. शिरोळ) यांनी पोलिस ठाण्यात दिली आहे. दामदुप्पट करण्याचे आमिष दाखवून शहरात कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याची घटना ताजी असताना नोकरीच्या अमिषाने तरुणांची फसवणूक झाल्याने शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

तक्रार अर्जात करडे यां,नी आपल्या दोन मुलांना आयकर विभागात नोकरी लावण्याचे अमिष दाखवून वेळोवेळी ६१ लाख ५० हजार रुपये रुद्रकुमार याला दिले आहे. ही रक्कम बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय बँक, आरबीएल आणि कॅनरा बँकेत रुद्रकुमारने दिलेल्या खात्यावर भरले आहे. शिवाय आर्मीमध्ये नोकरी लावतो असे सांगून सुबोधकुमार (कोलकत्ता) याने करडे यांच्यासह इतर १७ जणांकडून ७१ लाख ४९ हजार रुपये उकळले आहेत.

त्यातील ४० लाख ७४ हजार रुपये अँक्सेस, आयडीबीआय आणि आयसीआयसीआय बँकेत भरणा केला असून ३० लाख ७५ हजार रोखीने दिले आहे. २५ जुलैपासून दोघांचेही फोन बंद लागत असल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आले. फसवणूक करणार्‍या दोघा व्यक्तींनी मुलांना ट्रेनिंगसाठी, परीक्षेसाठी दिल्ली, बेंगलोर,दानापूर (बिहार), सिकंदराबाद, हैद्राबाद येथे बोलावून फसगत केली असल्याचे नमूद करून आहे. बँकेच्या नोंदी, ट्रेनिंग, परीक्षा देण्यासाठी तसेच नियुक्ती पत्र देण्यासाठी कोठे बोलावण्यात आली याच्या नोंदी करडे यांनी तक्रार अर्जात केली आहे.

मोठी आर्थिक फसवणूक असल्याने पोलिसांनी आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे मार्गदर्शन मागविले असून अनोळखी व्यक्तीला शोधण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे.