आजरा (प्रतिनिधी) : गजरगाव (ता. आजरा) येथील कोरांगी रस्त्यालगत असणाऱ्या १४ शेतकऱ्यांच्या १८ गवत गंजी आज (गुरुवार) दुपारी लागलेल्या आगीत जळून खाक झाल्या. त्याचप्रमाणे काजूची २० झाडांनाही आग लागली. यामध्ये शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे.

आज दुपारी १ च्या सुमारास कोरांगी रस्त्यालगत असणाऱ्या १४ शेतकऱ्यांच्या गवत गंजींना अचानक आग लागली. कडक उन्हामुळे आणि वाऱ्यामुळे ती क्षणार्धात पसरली. ही आग इतकी भीषण होती की ती विझवणे कठीण झाले. बंडू चोथे, रणजित चव्हाण, बाबू पाटील, पांडुरंग लांडे, संतोष कांबळे, वसंत केसरकर, शंकर केसरकर, मोहन कांबळे, सखाराम कांबळे, चंद्रकांत कांबळे, आनंदा अस्वले, इंदर कांबळे, बाळू रेडेकर, लक्ष्मण चव्हाण, विठ्ठल चव्हाण या शेतकऱ्यांच्या गंजी जळून सुमारे पाच लाखांचे नुकसान झाले आहे.

त्याचप्रमाणे या परिसरात असलेल्या काजूच्या २० झाडांनाही आग लागली. सर्व ग्रामस्थांनी एकत्र येत शर्थीचे प्रयत्न करून ही आग विझवली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. मात्र लाखोंचे गवत जळाल्याने हे १४ शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्याचप्रमाणे जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.