कागल (प्रतिनिधी) : केवळ शब्दांची आतषबाजी करणाऱ्या राज्य सरकारने जाहिरात बाजीवरच १६० कोटींची उधळपट्टी करून शेतकऱ्यांची मोठी फसवणूक केली आहे. कोरोना, अतिवृष्टी, पूर व वादळांसारख्या संकटात अगोदरच भरडलेल्या शेतकऱ्यास मदतीचा हात देण्याऐवजी जाहिरात बाजीवरच उधळपट्टी करून सरकारने शेतकऱ्यास उद्ध्वस्त केले आहे, अशी टीका भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यातील शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्याची गर्जना विधिमंडळात केली. त्याला दीड वर्ष उलटून गेल्यानंतरही शेतकऱ्याच्या पदरात कर्जमाफी पडलेलीच नाही. खोट्या जाहिरातींवर १६० कोटींची उधळपट्टी करण्याऐवजी १५० कोटी कर्जमाफीसाठी दिले असते, तर संकटग्रस्त शेतकऱ्यास दिलासा मिळाला असता. तसेच राज्यातील शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन कर्जमुक्त करण्याची घोषणा करणाऱ्या या सरकारने प्रत्यक्षात मात्र वीज दरवाढीचे धक्के देऊन शेतकऱ्यास वेठीस धरले आहे, पीक विम्याबाबतही विमा कंपन्यांशी साटेलोटे करून शेतकऱ्याची फसवणूक केली जात आहे, असा आरोप ही प्रसिद्धी पत्रकात केला आहे.

राज्यातील दीड लाख शेतकरी कुटुंबांना याचा फटका बसत असताना राज्य सरकार मात्र, केवळ पाहणी दौरे करीत आहेत. कर्जबाजारी शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत लाभ देण्याची घोषणा डिसेंबर २०१९ मध्ये मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्यावर कोणतीच कार्यवाही अद्याप झालेली नाही, अशी टीका या पत्रकात केली आहे.