कोल्हापूर ( प्रतिनिधी ) कोल्हापुरात कंदमुळांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून शहाजी कॉलेज, यशवंतराव चव्हाण सभागृह, दसरा चौक येथे हे प्रदर्शन खुले असणार आहे. ह्या प्रदर्शनाचे उद्घाटन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते आज पार पडले.

उद्घाटन प्रसंगी कुलगुरू शिर्के यांनी ”कंदमुळांचा उत्सव” ह्या उपक्रमाचे कौतुक केले. व निसर्गात उपलब्ध असणाऱ्या कंदमुळांची ओळख आणि माहिती सगळ्यांना होण्यासाठी अशी प्रदर्शन भरवणे आवश्यक आहे. पारंपरिक शेतीबरोबरच शेतकऱ्यांनी कंदमुळे आपल्या शेतीत लावावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. हे प्रदर्शन कोल्हापूर वुई केअर आणि एनजीओ कम्पॅशन २४ ह्या संस्थेने आयोजित केले आहे.

श्री. शाहू छत्रपती शिक्षण संस्था, गार्डन्स क्लब कोल्हापूर, वुई केअर हेल्पलाईन ,युथ एनेक्स ह्यांच्या सहकार्याने ह्या कंदमुळांच्या उत्सवास प्रारंभ झाला आहे. ह्या प्रदर्शनात ठेवण्यात आलेली ६० पेक्षा अधिक कंदमुळे शेतामध्ये लागवड करून गोळा केली आहेत. यामध्ये आळे कोन, पिल्ला कोन , कोन फळ, मुन्द चिरके, कणगा, काटेकणग, कोराडू, उंडे, शेंडवाळे, आडकोळी, तांबडे कणवाल, तांबडें सावर, सुकाळी कोन, करांदा, शतावरी, अनंत मूळ, अडकोळी, रामकंद, सबुकंद, कासार अळू, नागरकोन,सुरण, गाजर,कांदा, आले,लसूण, आंबे हळद, बीट, मुळा, कुरपनी अळू ह्या सारख्या अनेक दुर्मिळ व गुणकारी कंदमुळांचा ह्यात समावेश आहे.

६० प्रकारच्या कंदांपैकी १५ ते २० प्रकारचे कंद विक्रीसाठी उपलब्ध असून सुमारे ६ ते ७ प्रकारच्या कंदाच्या पाककृतीबाबतची माहिती उपस्थितांना येथे दिली जाणार असून हौशी खवय्यांना कंदापासून तयार केलेल्या विविध पदार्थांची चवही चाखता येणार आहे. हे प्रदर्शन दोन दिवस सुरु राहणार असून सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत खुले राहणार आहे.यावेळी मंजिरी कापडेकर , कल्पना सावंत, अमृता वासुदेवन, जयेश ओसवाल, सुशांत टकळक्की यांच्यासह निसर्गप्रेमी आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमास गडहिंग्लजचे प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे, कृषी अधिकारी उमेश पाटील, शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ.डी.आर. मोरे कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ.गीता पिल्लई, कोल्हापूर वुई केअर आणि एनजीओ कंपॅशन २४ चे अध्यक्ष मिलिंद धोंड, ज्येष्ठ वनस्पतीतज्ञ् डॉ. मधुकर बाचूळकर, शहाजी कॉलेजचे प्राचार्य आर.के. शानेदिवाण, मोहन माने आदि मान्यवर यावेळी उपस्थितीत होते.