कोल्हापुरातील बालकल्याण संकुलमधील १४ मुली कोरोनाबाधित…

0
339

कोल्हापूर (प्रतिनिधी) : बालकल्याण संकुलमधील १४ मुली आज (रविवार) कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने एकच खळबळ उडाली. त्यांना तातडीने महापालिकेच्या आरोग्य प्रशासनाच्या मदतीने शिवाजी विद्यापीठातील कोव्हिड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.

कोल्हापुरातील बालकल्याण संकुलमध्ये समाजातील अनाथ मुला आणि मुलींचे संगोपन केले जाते. कोरोनाचा कहर सुरू होऊन एक वर्ष झाले तरी आजपर्यंत एकही रुग्ण आढळला नव्हता. परंतु, आज येथे कोरोनाने शिरकाव करत ६ ते १८ वयोगतील तब्बल १४ जणींना बाधित केले. यामुळे बालकल्याण संकुल प्रशासन हादरले असून तातडीने उपचार व तपासण्या सुरू केल्या आहेत.

पाण्याच्या खजिन्या जवळील या संकुलमध्ये एका मुलीला तापाची लक्षणे जाणवत होती, म्हणून अँटीजन तपासणी केली असता ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली. तिच्या संपर्कातील अन्य मुलींची तपासणी केली गेली असता यामध्ये आणखी १३ मुली पॉझिटिव्ह आढळून आल्या. त्यांना तातडीने कोव्हिड सेंटरमध्ये भरती करण्यात आले. संपूर्ण संकुलात औषध फवारणी करण्यात आली. आणखी कोणाला लागण झाली असल्यास कळावी म्हणून उद्या (सोमवार) महापालिकेतर्फे मुलांची अँटीजन चाचणी केली जाणार आहे.