कागल (प्रतिनिधी) : येथील श्री. छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांना त्रिपक्षीय समितीने जाहीर केलेली १२ टक्के वेतनवाढ डिसेंबर २०२१ च्या पगारापासून लागू करण्याचा महत्वपूर्ण निर्णय शाहूच्या व्यवस्थापनाने घेतला आहे, अशी माहिती कारखान्याच्या अध्यक्षा सुहासिनीदेवी घाटगे यांनी दिली.

यावेळी शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, कारखान्याचे व्हा. चेअरमन अमरसिंह घोरपडे, संचालक मंडळ, कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण, कामगार युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते.

घाटगे पुढे म्हणाल्या की, वेतनश्रेणीत पगार घेणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना १२ टक्के वेतनवाढीचा लाभ होणार आहे. या वेतनवाढीच्या फरकाची होणारी रक्कमही देण्यात येणार आहे. कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व. विक्रमसिंह घाटगे यांनी सुरुवातीपासूनच कामगार हिताचे धोरण राबविले आहे. शाहूचे कामगार प्रामाणिकपणे व निष्ठेने संस्थेची सेवा योगदान देत आहेत. त्यामुळे  कारखान्याच्या प्रगतीत कामगारांचा मोलाचा वाटा आहे, असे गौरवोद्‌गार श्रीमती  घाटगे यांनी काढले.

पगारवाढीमुळे कर्मचाऱ्यांनी साखर पेढे वाटून व फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन अमरसिंह घोरपडे संचालक यशवंत माने, सचिन मगदूम, सतीश पाटील यांच्यासह युनियनचे सर्व पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.