जम्मू (वृत्तसंस्था) : काश्मिरातील पुंछमध्ये मिनी बस दरीत कोसळून ११ जण ठार झाले, तर २५ जण जखमी झाले आहेत. लष्कराच्या मदतीने सर्व जखमींना मंडी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मंडीचे तहसीलदार शहजाद लतीफ यांनी या अपघाताची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, बस मंडीहून सावजियांकडे जात होती. यादरम्यान बस दरीत कोसळली.

जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी सर्व मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख आणि जखमींना १ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. यासोबतच जखमींवर उत्तम उपचार करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट केले की, पुंछच्या सावजियांमध्ये झालेल्या वेदनादायक रस्ता अपघातात लोकांचा मृत्यू अत्यंत दुःखद आहे. माझ्या संवेदना आणि प्रार्थना कुटुंबीयांसोबत आहेत. जखमी लवकरात लवकर बरे होण्याची कामना करते.