शिरोळ (प्रतिनिधी) : सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी आज (शनिवार) शिरोळ येथील तहसीलदार कार्यालयामध्ये व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यामध्ये शिरोळ तालुक्यात सोमवार दि. १० मे पासून दहा दिवसांचा कडक लॉकडाऊन लागू करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या, हा निर्णय सर्वांच्या सूचना प्राप्त झाल्यानंतर एकमताने घेतला असल्याचे राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी सांगितले.

यावेळी राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दहा दिवसाच्या या काळात सकाळी सात ते साडे आठ वाजेपर्यंत केवळ दूध विक्री आणि किराणा विक्री सुरू राहणार आहे. भाजीपाला फिरुन विकण्यास या काळात मुभा राहील असे सांगितले. याशिवाय इतर सर्व प्रकारचे व्यापार उद्योग आणि व्यवसाय बंद राहतील असेही सांगितले. दरम्यान, येणाऱ्या रमजान ईदा दिवशी सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करता केवळ घरी नमाज पडावे. यावेळी दुपारी बारा वाजेपर्यंत लॉकडाऊनमध्ये शिथीलता राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या व्हिडिओ कॉन्फरन्स मध्ये जवळपास ८१ जणांनी सहभाग घेतला होता. यावेळी प्रांताधिकारी विकास खरात, तहसीलदार अपर्णा मोरे-धुमाळ, गटविकास अधिकारी शंकर कवितके, तालुका आरोग्याधिकारी डॉ. दातार यांच्यासह प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.