कोल्हापूर (प्रतिनिधी) : रंकाळा तलाव विकासासाठी जिल्हा नियोजन मंडळातून दरवर्षी एक कोटींचा निधी देण्यात येईल, अशी घोषणा पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली. नगरसेवक शारंगधर देशमुख यांच्या प्रयत्नातून रंकाळा तलाव परिसरात झालेल्या विविध विकासकामांचे व स्वयंचलित पद्धतीने बसविलेल्या विविध प्राण्यांच्या प्रतिकृतीचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले की, जलसंपदा विभागाकडे असलेली रंकाळा परिसरातील जागा हस्तांतरित करण्यात येईल. रंकाळ्यावरील विद्युतीकरणाच्या कामासाठी   तातडीने ५० लाखांचा निधी मंजूर केला जाईल. रंकाळा व कळंबा ही शहरातील दोन्ही ठिकाणे राज्यात आदर्शवत करु.

आमदार ऋतुराज पाटील म्हणाले की, शासनाच्या पर्यावरण विभागामार्फत रंकाळा विकासासाठी निधी आणण्याची जबाबदारी मी घेतली आहे. रंकाळ्यावर नगरसेवक देशमुख यांनी नाविन्यपूर्ण काम केले. रंकाळा संवर्धनात लोकांचा असलेला सहभाग खरोखरच कौतुकास्पद आहे.

शारंगधर देशमुख म्हणाले की, पालकमंत्री पाटील व महापालिका फंडातून रंकाळा परिसराचा विकास केला आहे. या पुढील काळातही रंकाळ्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्नशील राहू.

रंकाळा संवर्धनासाठी विशेष योगदान देणारे शाहीर राजू राऊत, श्रीकांत कदम, सुधीर गांधी, अजित मोरे, गुंडोपंत जितकर, राजेंद्र पाटील, विकास जाधव, धोंडीराम चोपडे, प्रा. एस. पी. चौगुले, सुभाष हराळे, आनंदराव चिखलीकर, संभाजी पोवार, कृष्णा सुतार, पांडुरंग इंगवले, ऋषीराज जाधव, अमित बुट्टे यांचा पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी माजी महापौर निलोफर आजरेकर, माजी उपमहापौर संजय मोहिते, माजी नगरसेवक सचिन पाटील, दीपा मगदूम, रीना कांबळे, माधुरी लाड, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, वसंतराव देशमुख, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, अनुराधा वांढरे, विजय सावंत, सुरज देशमुख, गुरुप्रसाद जोशी, गावकर काका, राहुल जाधव, दीपक आरोरा, आनंदा पाटणकर, उन्मेश जेरे आदी उपस्थित होते. राजेंद्र पाटील यांनी प्रास्ताविक केले. संदीप मगदूम यांनी सूत्रसंचलन केले. किरण पाटील यांनी आभार मानले.