कोल्हापूर (प्रतिनिधी) : महावितरणच्या कोल्हापूर ग्रामीण १ विभागाच्या शाहूवाडी उपविभागातील बांबवडे शाखा कार्यक्षेत्रातील ४० गावे व वाड्यांतील ५ हजार ४६२ वीज ग्राहकांनी १ कोटी १६ लाख रुपयांचे वीज बिल थकविले आहे. वीज ग्राहकांनी वीज पुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळण्यासाठी थकीत व चालू वीज बिल भरुन सहकार्य करण्याचे  आवाहन महावितरणने केले आहे.

बांबवडे शाखेतील ५ हजार ९६ घरगुती ग्राहकांकडे ८३ लाख ६५ हजार, २८८ वाणिज्य ग्राहकांकडे १७ लाख ४१ हजार तर ७८ औद्योगिक ग्राहकांकडे १४ लाख ९२ हजार रुपयांची थकबाकी आहे. बांबवडे गावातील ७८९ वीज ग्राहकांनी सर्वाधिक ३४ लाख ३४ हजार, डोणोली गावातील ३८५ वीज ग्राहकांनी १० लाख ३४ हजार, साळशी गावातील ४०५ वीज ग्राहकांनी ७ लाख ५३ हजार रुपयांचे वीज बिल थकविले आहे.

१९ वीज ग्राहकांकडे २५ हजारांहुन अधिक तर ८ वीज ग्राहकांकडे ५० हजारांहुन अधिक वीज बिल थकबाकी आहे. महावितरणकडून वीज बिलांची थकबाकी वसुली करण्याची मोहिम गतिमान केली आहे. थकबाकीदार वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत करण्याची कठोर कारवाई करण्यात येणार आहे. तर वीज बिल वसुलीकामी हयगय करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करण्याचा इशारा  अधीक्षक अभियंता अंकुर कावळे यांनी  दिला आहे.