कुंभोज (प्रतिनिधी) : हातकणंगले येथील तालुका प्राथमिक शिक्षक सेवकांच्या सहकारी पतसंस्थेत तत्कालीन चेअरमन, सचिव आणि शाखाधिकारी यांनी १ कोटी ५८ लाखांपेक्षा जास्त रकमेचा अपहार केल्याचे शासकीय लेखा परीक्षणामध्ये स्पष्ट झाले आहे. तत्कालीन चेअरमन, सचिव, आणि कर्मचारी अशा १० जणांविरुद्ध शासकीय लेखा परीक्षक सुभाष देशमुख यांनी हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

हातकणंगले तालुका प्राथमिक शिक्षक सेवकांच्य पतसंस्थेचे १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२० या आर्थिक वर्षाचे चाचणी लेखापरीक्षण करण्याचे आदेश जिल्हा आणि तालुका उपनिबंधक सहकारी संस्था यांनी शासकीय लेखापरीक्षक सुभाष दादासाहेब देशमुख यांना दिले होते. अनियमित व्यवहार, नियमबाह्य गुंतवणूक तसेच संगनमताने बनावट दस्तऐवज तयार करुन संस्थेच्या निधीचा स्वत:च्या खासगी फायद्यासाठी वापर केला असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. यामुळे ठेवीदारांच्या ठेवी परत करणे अडचणीचे झाल्याचे स्पष्ट मत लेखापरीक्षकांनी नोंदविले आहे.

तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे तत्कालीन चेअरमन- बाबासो दादा पाटील (हातकणंगले), सचिव- हिम्मतराव दतू पोळ-देसाई (रुकडी), शाखाधिकारी धन्यकुमार जनगोंडा पाटील (नेज), शाखाधिकारी बाळासो शामराव गारे (नेज), अशोक श्रीपाल मुरचिटे (रुई), सुरेश जिनपाल मुरचिटे (रुई), भरत बापूसो उपाध्ये (नेज), विजयकुमार भगवान शिंगे (नेज), ऋषीकेश हिम्मतराव पोळ (रुकडी) आणि अभिजित गोपाळ देसाई (हातकणंगले) या १० जणांविरुद्ध शासकीय लेखापरीक्षक सुभाष देशमुख यांनी १ कोटी ५८ लाख ३८ हजार २४० रुपयाचा अपहार केल्याचा गुन्हा हातकणंगले पोलीस ठाण्यात दाखल केला आहे.

हनुमान ग्रामीण पतसंस्था नेज- रक्कम कीर्दला जमा नाही- ४३ लाख ९० हजार, शाखाधिकारी धन्यकुमार पाटील यांच्या सेव्हिंग खात्यावर जमा- १९ लाख २३ हजार ६००, सोनाली पतसंस्था हातकणंगले नावे- १ लाख ५० हजार, नेज पश्चिम भाग पाणीपुरवठा नावे- २१ लाख ६२ हजार, हनुमान पतसंस्था नेज जमा नाही- ११ लाख २५ हजार, व्यंकटेश्वरा वाहनधारक संस्था नावे- ५ लाख, लक्ष्मी पतसंस्था रुई नावे- ११ लाख, कोजिमाशी नावे- २ लाख, व्यंकटेश्वरा वाहनधारक संस्था कीर्द जमा नाही- २२ लाख, कर्ज खात्यावर वैयक्तिक अनधिकृत खर्च- ८७ हजार ६४० अशा प्रकारे या संस्थांकडे रकमा जमा केल्या नसल्याने बनावट दस्तऐवज तयार करून १ कोटी ५८ लाख ३८ हजार २४० रूपयांचा अपहार केल्याचा ठपका शासकीय लेखापरीक्षकांनी ठेवला आहे.