नवरात्रोत्सव २०१९ : पहिल्या दिवशी श्री अंबाबाईची त्रिपुरसुंदरी स्वरूपात पूजा

0 204

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील साडे तीन शक्तीपिठांपैकी पूर्ण शक्तीपीठ म्हणून करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे पुज्यस्थान आहे. आजपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होत असून आज नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सकाळी तोफेच्या सलामीनंतर मंदिरात घटस्थापना करण्यात आली. यानंतर दुपारी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची त्रिपुरसुंदरी स्वरूपात पूजा बांधण्यात आली होती.

अंबाबाई देवीची शासकीय पूजा सकाळी साडेदहा वाजता पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे व्यवस्थापक धनाजी जाधव यांच्या हस्ते झाली. पौराहित्य योगेश व्यवहारे, सागर भोरे, ओमकार भोरे, मारूती भोरे यांनी केले. नवरात्र निर्विघ्नपणे पार पडावी असे जगदंबेच्या चरणी प्रार्थना करून देवीचे अवाहन, पाद्यपूजा, कुंकुमार्चन, पंचामृत अभिषेक, जगदंबेला वस्त्रअर्पण केले. सर्वांना सुख समाधान मिळो अशी प्रार्थना करून विधीची आणि शासकीय पूजेचे सांगता केली. देवस्थान समितीने नवरात्रोत्सवची नियोजनबध्द तयारी केली आहे. नवरात्रीच्या ९ दिवसात विविध कार्यक्रमांचे आयोजन समितीकडून करण्यात आले आहे.

श्री अंबाबाईचे त्रिपुरसुंदरी स्वरूप

आदि शंकराचार्यांनी रचलेले हे त्रिपुरसुंदरी अष्टक म्हणजे आठ श्लोकांचे स्तोत्र देवीउपासकांमध्ये, विशेषत: श्रीविद्या सांप्रदायिकांमध्ये अत्यंत आदरणीय आणि प्रिय आहे. त्रिपुरसुंदरीचे वर्णन अत्यंत रसाळ पद्धतीने केले असून अंतर्चक्षूसमोर शंकराचार्य साक्षात देवीचे प्रतिबिंब उभे करतात. त्या अष्टकामधील हा श्लोक देवीच्या सगुण स्वरुपाचे वर्णन करतो. श्लोकाचा

आशय असा:

जीने कुंकवाचे विलेपन केले आहे, जिच्या मस्तकावरील कस्तूरीतिलकाला केसांच्या कुरळ्या बटा स्पर्श करू पाहताहेत, जी मृदुल आहे, जीच्या चेहऱ्यावर मंद हसू आहे, जीने हातांमध्ये बाण, धनुष्य, पाश आणि अंकुश धारण केले आहेत, जी तिन्ही लोकांना संमोहित करुन आहे, जीने लाल रंगाची वस्रे धारण केली आहेत आणि जी तांबड्या जास्वंदीच्या फुलांनी शोभून दिसते, अशा त्या देवीचं अथवा अंबिकेचं जपाद्वारे मी स्मरण करतो.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish.AcceptRead More