लाईव्ह मराठी स्पेशल : कोल्हापुरी ठसका – कोल्हापूरकर म्हणजे कुणी गुंड, लुटारू आहेत का ?

0 20

‘व्हिजन २०२५’ या कार्यक्रमात खा. संभाजीराजे छत्रपती यांनी केलेल्या वक्तव्यामुळे कोल्हापूरकरांच्या मनात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. कोल्हापूरच्या धास्तीमुळे तीन हजार कोटींचा प्रकल्प औरंगाबादला गेला, हे त्यांचे वक्तव्य आश्चर्यजनक तसेच सर्वसामान्य कोल्हापूरकरांचा अवमान करणारे आहे.

(जाहिरात – 🎓 शिक्षणामध्ये तुमचे उद्दिष्ट कोणतेही असो, आजच करा तुमच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी !

👉🏼नर्सरी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी परफेक्ट डेस्टिनेशन

🏫चाटे शिक्षण समूह

📌 ‘लाईव्ह मराठी’च्या वाचकांसाठी सर्व कोर्सेसवर खास ५ टक्के सूट

📲 प्रवेशासाठी संपर्क – ९३२६६१४४४० / ९३७१६११४८५)

कोल्हापूरकर म्हणजे कुणी गुंड, लुटारु आहेत की काय, अशी प्रतिमा या वक्तव्यामुळे निर्माण होण्याची भीती वाटू लागली आहे. अत्यंत मितभाषी असलेल्या खा. संभाजीराजे यांची अलिकडची काही वक्तव्ये अनाकलनीय वाटू लागली आहेत. गुंतवणूकदारांना धास्ती वाटावी अशी कोणती आणीबाणी निर्माण झाली, हेच उमगत नाही. संभाजीराजे यांनी आपल्या वक्तव्यात टोल आंदोलनाचा उल्लेख केला. टोलचे आंदोलन चुकीचे होते, असे त्यांना म्हणावयाचे आहे काय, असा प्रश्न पडतो.

टोलविरोधातील आंदोलन हे ‘जन आंदोलन’ होते. त्यात ज्येष्ठ नेते, प्रा. डॉक्टर एन. डी. पाटील यांच्यासारख्या दिग्गजांनी भाग घेतला होता. त्यांची भूमिका चुकीची होती का ? रस्ते प्रकल्पाची मूळ संकल्पना खूप चांगली होती. तत्कालीन आयुक्त कुणालकुमार यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प आकाराला आला. शहरांंतर्गत रस्त्यांसाठी देशातील पहिला पथदर्शी प्रकल्प ठरला असता. या प्रकल्पासाठी महापालिकेला जागतिक बँकेकडून अर्थसाह्य मिळेल, अशी आशा आयुक्त कुणालकुमार यांना होती. पण ते होऊ शकले नाही.

त्यानंतर हा प्रकल्प राज्य शासनाकडे गेला आणि तेथूनच या प्रकल्पाला ‘अर्थ’ येत गेला. या प्रकल्पासाठीचा ठराव महापालिकेत व्हावा, म्हणून महासभा सुरू असताना कोणी-कोणी फोन केले हे सगळ्या जगाला माहीत आहे. या प्रकल्पात कोणी कोणी हात धुऊन घेतले, हेही उघड आहे. मूळ प्रकल्पाप्रमाणे काम झालेच नाही. युटिलिटी शिफ्टिंग झाले नाही. ‘रस्ते वर आणि घरे खाली’ अशी अवस्था निर्माण झाली.

या सदोष प्रकल्पाच्या टोलचे भूत जनतेच्या मानगुटीवर तीस वर्षे किंबहुना वसुली झाली नाही म्हणून आणखी काही वर्षे जादा बसले असते. कोल्हापूरसारख्या निसर्गसंपन्न जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील पाटणे फाटा औद्योगिक वसाहतीतील अति प्रदूषणकारी ए.व्ही.एच. प्रकल्पही हाकलून लावला. तेही चुकीचे होते, असे संभाजीराजेंना म्हणायचे आहे काय ? कोल्हापूरकरांना कोणीही यावे आणि चुना लावून जावे, अशी परिस्थिती नाही. इथले लोक सुज्ञ, अभ्यासू, कष्टाळू आहेत. त्यांना फसवणे इतके सोपे नाही. कोल्हापूरचा जो काही विकास झाला आहे, तो स्वबळावर झाला आहे. सर्वसामान्यांचा त्यात सिंहाचा वाटा आहे.

काही टोळकी स्वार्थापोटी जरुर पाय आडवा घालण्याचा प्रयत्न करीत असतील. पण त्यांच्यामुळे कोल्हापूरची प्रतिमा मातीमोल होत नाही. शहराची प्रतिमा निर्माण करण्याचे काम लोक प्रतिनिधींचे असते. त्यांचे हात बरबटलेले असतील, ते केवळ आपला राजकीय स्वार्थ बघणार असतील, तर तो दोष सर्वसामान्यांचा नाही. कोल्हापूरची चांगली प्रतिमा निर्माण करण्याऐवजी सर्वसामान्यांचा बळी देऊन नामानिराळे होण्याचा हा प्रकार आहे. संभाजीराजे यांच्याबद्दल आमच्या मनात नितांत आदर आहे. मात्र, गुंतवणूक आणि आरक्षणासंबंधी त्यांच्या वक्तव्यामुळे सर्वसामान्यांच्या मनाला दुःख झाले आहे हे मात्र निश्चित.

शिवाजी उद्यमनगर ही स्थानिक जुनी औद्योगिक वसाहत आहे. तेथील दुहेरी करासारखा प्रश्न वर्षानुवर्ष सुटत नाही. त्याला जबाबदार कोण ? गुंतवणूक झालेल्या उद्योगात स्थानिकांना किती स्थान मिळाले, हाही संशोधनाचा मुद्दा आहे. गुंतवणूकदारांच्या मनात कोल्हापूरविषयी ‘धास्ती’ निर्माण होण्याऐवजी ‘आस्था’ निर्माण होण्यासाठी संभाजीराजे यांनी प्रयत्न करावेत. येथे चांगले प्रकल्प यावेत, यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत. त्यासाठी सर्वसामान्य कोल्हापूरकर त्यांच्या पाठीशी सदैव उभा राहील. मात्र सर्वसामान्यांचा अवमान होईल, अशी वक्तव्ये त्यांनी करू नयेत, एवढीच माफक अपेक्षा आहे.

ठसकेबाज…

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish.AcceptRead More