लाईव्ह मराठी स्पेशल : कोल्हापुरी ठसका – महापौरपदाची खांडोळी थांबेल तो ‘सुदिन..!

0 20

महापौर म्हणजे शहराचा प्रथम नागरिक. सर्वांना बरोबर घेऊन शहराच्या सर्वांगीण विकासासाठी ध्येय-धोरणे निश्चित करणाऱ्या सभागृहाचे नेतृत्व करणारी सन्माननीय व्यक्ती. महापौर पदाचा कालावधी कायद्याने निश्चित असतो. पण, कोल्हापुरात मात्र सोईच्या राजकारणासाठी कायद्यातून पळवाट काढून या कालावधीचीच मोडतोड केली जात आहे आणि ही परंपरा आजही कायम आहे.

कोल्हापूरच्या महापौरपदाची खांडोळी हा विषय साऱ्या जगाला माहीत आहे. महापौरपद चेष्टेचा विषय बनला आहे. कोल्हापूर म्हणजे ‘लय भारी शहर’ आहे. त्यामुळे इथले राजकारणी सरळसोट मार्गाचे असणे शक्यच नाही. जेव्हा राजकारण केवळ सत्तेचे होऊ लागते, तेव्हा ‘बारा भानगडी, शेकडो तडजोडी’ केल्या जातात. ज्यांनी कायदा करायचा त्यांनीच तो मोडायचा, भंगारात काढायचा असा उद्योग होत आहे.

महापौरपदाची खांडोळी ‘राजकीय सोय’ म्हणून होत असली तरी त्यासंबंधी कोणी कोणाला जाब विचारायचा हाच खरा कळीचा मुद्दा आहे. महापौरपदाची ‘शान’ वाढवण्याऐवजी ती कमी करण्यासाठी प्रयत्न होताना दिसतो. महापौरपदाचा कालावधी कायद्यातील तरतुदीनुसार अडीच वर्षांचा आहे. तेवढा कालावधी एखाद्याला मिळणे अपेक्षित आहे. मात्र, कोल्हापुरात या कालावधीची खांडोळी केली जाते ती अपवाद म्हणून नव्हे, तर ती आता ‘परंपरा’च झाली आहे. तीन महिन्यांचा महापौर अशी हेटाळणी होत असूनही, मोठ्या कौतुकाने ही परंपरा जपली जात आहे.

तीन महिन्यांच्या कालावधीत पहिला महिना सत्कार-समारंभात जातो. दुसरा महिना कामकाज समजून घेण्यात जातो. आणि तिसरा महिना समारोपात जातो. त्यात एखाद्या निवडणुकीची आचारसंहिता लागली की, हातात शून्य दिवस राहतात. त्यामुळे नामधारी महापौर म्हणूनच वावरावे लागते. केवळ राजकारणाच्या सोईसाठी या पदाची खांडोळी केली जाते. प्रत्येक राजकारणी आपली पुढची ‘बेजमी’ म्हणून अशा अर्थशून्य तडजोडी करत राहतो.

पूर्वी पंचक्रोशीत एखादा इंजिनियर असायचा. त्यानंतर प्रत्येक गावात इंजिनिअर झाले. आता तर घरोघरी इंजिनिअर झाले आहेत. अशीच कांही अवस्था कोल्हापुरात महापौरपदाची झाली आहे. कोणत्याही गल्लीबोळात जा, एक तरी ‘माजी महापौर’ अशी पाटी नजरेस पडल्याशिवाय राहणार नाही. कोल्हापुरात इतके माजी महापौर झाले आहेत की आता त्यांची संघटना स्थापन झाली आहे. एकूणच काय, या खांडोळी प्रकरणामुळे महापौरपदाची प्रतिष्ठा कमी झाली, हे मात्र खरे… या पदाची खांडोळी करणे योग्य नाही, हे ‘कारभारी राजकारण्यां’च्या लक्षात येईल तो समस्त कोल्हापुरी जनतेच्या दृष्टीने ‘सुदिन’ असेल. बाकी तूर्त तरी सगळाच ‘आनंदीआनंद…

ठसकेबाज….

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish.AcceptRead More