कुस्तीपटू नरसिंह यादव पोलीस सेवेतून निलंबित

0 18

मुंबई (प्रतिनिधी) : काँग्रेस नेते संजय निरुपम यांचा प्रचार कुस्तीपटू नरसिंह यादवला भलताच महागात पडला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर नरसिंह यादवला पोलीस सेवेतूनही निलंबित करण्यात आले.

नरसिंह यादव हा सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) पदावर कार्यरत आहे. नरसिंहने वायव्य मुंबई मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार संजय निरुपम यांच्या प्रचारासाठी हजेरी लावली होती. परंतु, नरसिंह सरकारी सेवेत असल्याने त्यांच्या प्रचारावर विरोधकांनी आक्षेप घेतला.

या प्रकरणाची दखल घेत बंदोबस्तावर तैनात असलेल्या पोलिसांकडून अहवाल मागवण्यात आला. या आरोपांची शहानिशा करण्यासाठी व्हिडीओ आणि फोटो यांची पडताळणी करण्यात आली. त्यात यादव यांचा सहभाग आढळल्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर प्रशासनाकडून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. 

नरसिंह यादवने २०१० सालच्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. त्याच्या या कामगिरीचा गौरव म्हणून महाराष्ट्र पोलीस दलात त्याची उपअधीक्षक पदावर नियुक्ती करण्याचे आदेश देण्यात आले. मात्र, त्याचे पदवीचे शिक्षण पूर्ण न झाल्यामुळे २०१२ मध्ये नरसिंहला सहाय्यक पोलीस आयुक्त या पदावर नियुक्ती मिळाली होती. मात्र, आता निरुपमांच्या प्रचारामुळे नरसिंहच्या नोकरीवर गदा आली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish.AcceptRead More