टोप (प्रतिनिधी)  :  स्क्रॅपने भरलेल्या  भरधाव ट्रकने दुचाकीला पाठीमागून दिलेल्या जोरदार धडकेत महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर तिचे वडील व मुलगी जखमी झाले. हा अपघात आज (मंगळवारी) दुपारी १ वाजण्याच्या सुमारास टोप कासारवाडी फाटा येथे झाला.  याबाबत वडील रामचंद्र पोवार यांनी शिरोली पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे – बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर टोप कासारवाडी फाटा येथे पुण्याहून कागल येथील फाईव्ह स्टार एमआयडीसीत स्क्रॅप घेऊन जाणाऱ्या ट्रकने (एमएच  ९ सीयु ९६१७)  मोटरसायकलला (एमएच ०९ एफए ३९३७) पाठीमागून जोराची धडक दिली. यात मोटरसायकलवरील सुमित्रा मोहन पुदाले (वय३० रा. कोरेगाव ता. वाळवा जि.सांगली) या ट्रकच्या चाकात सापडून जागीच ठार झाल्या. तर तिची मुलगी तनिष्का पुदाले (वय ५) व वडील रामचंद्र पोवार (वय ६० रा. वरणगे पाडळी ता. करवीर) हे जखमी झाले.

रामचंद्र पोवार हे मुलगी सुमित्रा हिला भावाचा वाढदिवस व नातेवाईकाच्या लग्न कार्यासाठी वरणगे पाडळी येथे माहेरी घेऊन येत असताना हा अपघात झाला. या अपघातामुळे वरणगे पाडळी येथे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

याच मार्गांवरून जिल्हा पोलिस प्रमुख शैलेश बलकवडे जात  होते. अपघातस्थळी जाऊन त्यांनी जखमींना तत्काळ रूग्णालयात नेण्याच्या सूचना केल्या. शिरोली पोलिसांनी ट्रक चालक शेरनबाब गणीहूसेन फकीर यास ताब्यात घेतले आहे. या अपघाताची नोंद शिरोली पोलीस ठाण्यात झाली आहे.