नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली वगळता देशातील अनेक राज्यांत कोरोनाची साथ आटोक्यात असली तरी ती पूर्णपणे संपलेली नाही. दिल्लीत सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे यंदाचं संसदेचं हिवाळी अधिवेशन रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज (मंगळवार) दिली आहे.

जोशी यांनी सांगितले की, देशभरात कोरोनाचा संसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी अनेक पक्षांनी हिवाळी अधिवेशन घेऊ नये असं मत मांडलं होतं. त्याचबरोबर संसद भवनाचं बांधकाम सुरू आहे. त्यामुळे आता जानेवारीत अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे. दिल्लीत शेतकरी आंदोलन सुरू आहे. त्यामुळे कृषी कायद्यांवर चर्चा करण्यासाठी हिवाळी अधिवेशन घेण्यात यावं अशी मागणी काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी केली होती. मात्र, कोरोना संसर्गामुळे यंदाचं हिवाळी अधिवेशन होणार नसल्याचं प्रल्हाद जोशी यांनी स्पष्ट केलं आहे.