इचलकरंजी (प्रतिनिधी) : मागील वर्षी इचलकरंजी नगरपालिकेचा ५९० कोटींचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला होता. यावर्षी त्यात वाढ होणे अपेक्षित असताना तो ४३७ कोटी इतका कमी कसा झाला, असा सवाल करीत विरोधकांनी सत्ताधारी गटावर टीकेची झोड उठवली. सन २०२०-२१ चे दुरुस्त आणि सन २०२१-२२  चे वार्षिक ४३७ कोटी ३२ लाख रुपयांचे अंदाजपत्रकासह विविध ८३ व ऐनवेळचे ५ अशा ८८ विषयांवर चर्चेअंती निर्णय घेण्यासाठी नगराध्यक्ष सौ. अलका स्वामी यांनी आज (शुक्रवार) इचलकरंजी नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा बोलविली होती. तब्बल दीड तासांच्या चर्चेनंतर हा अर्थसंकल्प २९ विरुद्ध १३ मतांनी मंजूर करण्यात आला.

अर्थसंकल्पावर चर्चा करताना नगरसेवक प्रकाश मोरबाळे यांनी, गतवर्षी ५९० कोटींचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला होता. तर यंदा ४३७ कोटींचा अर्थसंकल्प असल्याने तो कमी कसा झाला असा सवाल केला. जमेच्या बाजूला निधी किती शिल्लक आहे याचा अभ्यास करणे आवश्यक असताना तो न करता खर्चाच्या बाजूलाच अधिक निधीची तरतूद असल्याचे दिसते. त्याचबरोबर उत्पन्न वाढीचे उपाय सुचविणे, शहापूर देवस्थान विकासासाठी तरतूद नाही, खासदार-आमदार फंडातील कामांसाठी हिश्श्याची तरतूद नाही असे म्हणत टीका केली.

नगरसेवक शशांक बावचकर यांनी, हा अर्थसंकल्प बोगस असल्याचा आरोप करत त्यामध्ये कोणत्याही नाविन्यपूर्ण योजनांचा समावेश नाही. नगरपालिकेत तीन पक्षांचे सरकार असताना अभ्यासपूर्ण अर्थसंकल्प सादर करता आला नसल्याकडे लक्ष वेधले. अंदाजपत्रकात स्थायी समितीने सुचविलेल्या बजेटमध्ये तब्बल ३२.७६ कोटींची वाढ केली आहे. केवळ खर्चाचीच तरतूद त्यामध्ये केली असल्याचे दिसून येते. सुळकूड योजनेसाठी कसलीही तरतूद नसल्याचे निदर्शनास आणून देत बजेट किती अभ्यासपूर्ण मांडला आहे असा टोला लगावला. तसेच वाढीव ३२.७६ कोटी कमी करावेत, अशी मागणी केली.

उपनगराध्यक्ष तानाजी पोवार यांनी, विविध समित्यांकडून शहरासाठी नावीन्यपूर्ण योजना आणण्यात येणार आहेत. त्यासाठी मोठ्या अनुदानाची गरज असल्याने विविध हेडखाली अनुदानाची तरतूद केल्याचे सांगत अर्थसंकल्पाला सर्वांनी मंजुरी देण्याची विनंती केली. तब्बल दीड तासाच्या चर्चेनंतर २९-१३ अशा मतांनी  अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. या वेळी तीन नगरसेविका तटस्थ राहिल्या