मुंबई (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना अंमली पदार्थ प्रकरणी अटक झाल्यानंतर विरोधकांनी मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उत्तर दिले आहे. जावयाने काही गुन्हा केला असेल तर कायद्याने योग्य ती कारवाई होईल. त्याच्या चुकीची शिक्षा सासऱ्यानं का भोगावी, असे पाटील यांनी म्हटले आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.

पाटील  म्हणाले की, नवाब मलिक यांच्या जावयाने काही गुन्हा केला असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे. त्यांना कशाच्या आधारे अटक केली आहे हे मला माहीत नाही. चौकशीतून सर्वकाही स्पष्ट होईल व पुढील कारवाई होईल. त्यात राज्य सरकार  हस्तक्षेप करण्याचा प्रश्नच येत नाही.  मात्र,  जावयाचं कुटुंब स्वतंत्र असते. जावयाने काही गुन्हा केला असेल, तर सासऱ्याच्या राजकीय कारकीर्दीवर परिणाम होऊ  शकत नाही, असेही पाटील म्हणाले.